मतदारांशी संपर्क साधण्यासाठी उमेदवारांची प्रचारफेरी, पदयात्रा, कोपरा सभा, पत्रकांचे वाटप या पारंपरिक पद्धतींचा प्रचारासाठी वापर करतानाच लोकसभेच्या रिंगणात उतरलेले पुण्यातील उमेदवार प्रचाराची नवीन तंत्रही वापरणार आहेत. अर्थात त्यातही वैविध्य आहे. ‘चाय पे चर्चा’ पासून युवती चौपाल पर्यंत आणि उमेदवाराच्या मोबाइल अ‍ॅपपासून, ह्य़ूमन बॅनरपासून मुळशी पॅटर्न मेळाव्यांपर्यंत अनेकविध कल्पना प्रचारासाठी लढवल्या जात आहेत.
प्रमुख उमेदवारांच्या प्रचारासाठी नवीन तंत्र काय काय असतील याची माहिती प्रचारयंत्रणा सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’ला दिली.
विश्वजित कदम (काँग्रेस)-
नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवमतदारांच्या हातात संपर्काचे जे कोणते साधन आहे, त्या साधनाचा उपयोग कदम यांच्या प्रचारासाठी करून घेतला जाणार आहे. फेसबुक, वॉटस्अप या बरोबरच कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी संस्था भेटी, समाजांचे, जातींचे मेळावे आयोजित केले जाणार आहेत. पुण्यात असलेल्या मुळशीवासीयांचा मेळावा, कोकणवासीयांचा मेळावा असेही गावनिहाय मेळावेही होणार असून इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाचा जास्तीजास्त वापर या निवडणुकीत कदम यांच्या प्रचारासाठी केला जाईल.
अनिल शिरोळे (भारतीय जनता पक्ष)-
पारंपरिक प्रचाराचा भर याही निवडणुकीत असेलच आणि त्याला आणखी चार कार्यक्रम या वेळी भाजपने जोडले आहेत. युवा मतदारांची लक्षणीय संख्या विचारात घेऊन युवतींशी संवाद साधण्यासाठी ‘युवती चौपाल’ (युवतींच्या गटसभा) हा कार्यक्रम यंदा नव्याने होणार आहे. त्याबरोबरच पुण्यातील सोसायटय़ांमध्ये ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे मतदारांशी संपर्क व त्यांना मतदानाचे आवाहन असाही उपक्रम होणार आहे. गुढीपाडव्यापासून सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये सहा एलईडी रथ फिरणार असून नरेंद्र मोदी यांच्या भाषणांच्या ध्वनिचित्रफिती या रथांवरून दाखवण्यात येणार आहेत. युवक-युवतींच्या गटांची पथनाटय़ही बसवण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातूनही शिरोळे यांचा प्रचार केला जाईल.  
दीपक पायगुडे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)-
निवडणुकीसाठी पायगुडे यांचे मोबाइल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. एमएनएस दीपक पायगुडे या नावाने हे अ‍ॅप असून त्याचे उद्घाटन मंगळवारी होईल. उमेदवाराचे परिचय पत्रक घरोघरी वाटले जाते. त्याच पद्धतीचे पायगुडे यांचे परिचय पत्रक या अ‍ॅपवर आहे. त्यात पायगुडेंची व्यक्तिगत माहिती, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य वगैरे पाहता येईल. याच अ‍ॅपवर पायगुडे यांच्या प्रचाराच्या ताज्या घडामोडी, पदयात्रा यांचीही माहिती सतत अपडेट होत राहील. त्याचे लाइव्ह कव्हरेज व्हीडीओच्या माध्यमातून पाहता येईल तसेच ताजी छायाचित्रही अ‍ॅपवर पाहता येतील. पायगुडे यांचे संकेतस्थळही तयार करण्यात आले असून ट्विटर अकाउन्टही सुरू होत आहे.
प्रा. सुभाष वारे (आम आदमी पक्ष)-
आम आदमी पक्षाचा भर सोशल मीडियाइतकाच डोअर टू डोअर प्रचारावरही राहणार आहे. या प्रचारात अनेक लोकांशी संवाद साधता येतो. त्यामुळे प्रा. वारे यांनी या पद्धतीच्या प्रचाराला चांगलेच महत्त्व दिले आहे. जाहिराती, होर्डिग वगैरेवर इतर पक्षांइतका खर्च करणे शक्य नसल्यामुळे ‘ह्य़ूमन बॅनर’ असा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचा प्रचार करणारे फलक हातात धरून पक्षाचे कार्यकर्ते गर्दीच्या चौकांमध्ये रोज दोन-दोन तास उभे राहतात. त्याबरोबरच ह्य़ूमन जॅकेटही तयार करण्यात आली आहेत. या जाकिटावर उमेदवाराचे चिन्ह व उमेदवाराची आणि पक्षाची माहिती आहे. ते जाकिट घालून पक्षाचे कार्यकर्ते सर्वत्र फिरतात आणि प्रा. वारे यांचा प्रचार करतात.