पुणे शहरातील मामलेदार कचेरीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनामार्फत हटवण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ पुणे शहरातील विविध शिवप्रेमी संघटनांकडून मामलेदार कचेरी येथे ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी राज्य सरकार आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

यावेळी ठाकरे गटाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, “मामलेदार कचेरी ही ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूमध्ये कोणतेही बांधकाम किंवा डागडुजी करायची असल्यास, सर्व परवानग्या घेऊनच कार्यवाही केली जाते. मात्र, सद्यस्थितीला अधिकारी वर्गाने कोणतीही परवानगी न घेता, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे काम केले आहे.

या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा याच ठिकाणी बसवावा. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जात नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.