पुणे : ‘शिवजयंती साजरी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आवश्यक त्या सुविधा द्याव्यात. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करावी,’ अशी मागणी महापालिकेत आयोजित शिवजयंती बैठकीत करण्यात आली. शिवजयंती साजरी करताना आवश्यक ते नियोजन करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्तांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महापालिकेच्या वतीने शहरात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते. त्याचे नियोजन करण्यासाठी बुधवारी महापालिकेत पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., उपायुक्त माधव जगताप, संदीप कदम, विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, नगरसचिव योगिता भोसले उपस्थित होते. शहरातील विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटना, शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली.

‘शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता करून पुष्पहार घालण्यात यावेत. मिरवणूक मार्गावर पाण्याची व्यवस्था करावी, झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, फिरता दवाखाना व फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी. चित्रकला स्पर्धेबरोबरच चित्ररथ स्पर्धाही घ्यावी. शाळांमधून चित्रकला, वक्तृत्व, महानाट्य तसेच वेशभूषा स्पर्धा घ्याव्यात, मिरवणूक परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवावी, लाल महाल राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी प्रयत्न करावेत आदी मागण्या करण्यात आल्या.

‘शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीसाठी कमी वेळेत आवश्यक ते परवाने देण्याचा प्रयत्न करू. पोलिसांकडून सहकार्य केले जाईल,’ असे आश्वासन पोलिस उपायुक्त मोहिते यांनी दिले. पोलिसांकडून एक खिडकी योजनेतून सर्वांना परवाने दिले जातील. महापालिकेतर्फे शिवाजी महाराजांच्या सर्व पुतळे व स्मारकांच्या ठिकाणी साफसफाई, रंगरंगोटी व रोषणाई केली जाईल. आवश्यकतेनुसार झाडांच्या फांद्या छाटण्यात येतील. रस्त्यांची दुरुस्ती केली जाईल. मिरवणूक मार्गांवरील फायबर ऑप्टिकल केबल काढण्यात येतील. लाल महालाची स्वच्छता केली जाईल. शिवजयंतीच्या दिवशी लालमहाल अधिक वेळ खुला ठेवण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Provide facilities for shiv jayanti festival shivaji devotees to the pune municipal corporation pune print news ccm asj