पुणे : महापालिकेचे मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालय यांच्यात समन्वय नसल्याने नागरी प्रश्न प्रलंबित राहत असल्याचे निदर्शनास आल्याने या प्रश्नांचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी मासिक सभा घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी त्याबाबतचे कार्यालयीन आदेश प्रसिद्ध केले आहेत. या बैठकीचा अहवाल आयुक्तांना सादर करण्याचा आदेशही त्यांनी दिला आहे.

क्षेत्रीय स्तरावरील स्थानिक कामे आणि नागरी प्रश्नांचा निपटारा स्थानिक पातळीवर होत नसल्याच्या असंख्य तक्रारी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे होत आहेत. त्यामुळे नागरिक आणि स्वयंसेवी संस्था नागरी प्रश्न घेऊन आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र मुख्य खाते आणि क्षेत्रीय कार्यालय यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे प्रश्न प्रलंबित राहत असल्याचे निदर्शनास आल्याने अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी कार्यालयीन परिपत्रक काढून संयुक्त मासिक सभा घेण्याचे बंधनकारक केले आहे.

हेही वाचा : पुणे: ऐन पावसाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा

सर्व क्षेत्रीय उपआयुक्तांनी सहायक महापालिका आयुक्तांबरोबर प्रत्येक महिन्याला सभा घ्यावी. त्यामध्ये स्थानिक समस्यांचा आढावा घेतला जावा. क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांची सद्य:स्थिती आणि त्याबाबत मुख्य खात्यांशी समन्वय ठेवण्यात यावा. सांडपाणी आणि पदपथ देखभाल दुरुस्तीची कामे विनाविलंब पूर्ण करण्यात यावीत. पथदिवे आणि पाणीपुरठ्याच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, घनकचऱ्यासंदर्भात प्रभागात निर्माण होणाऱ्या समस्या दुर्लक्षित करण्यात येऊ नयेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवावी आणि क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणारी कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. यानुसार बैठकीत झालेल्या चर्चा आणि उपाययोजनांचा अहवाल आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात यावा. तसेच पुढील मासिक बैठकीच्या वेळी गेल्या बैठकीत समस्यांवर काेणती कार्यवाही झाली, याचा तपशील सादर करावा, असे या कार्यालयीन परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.