पुणे : पुण्यातील ‘अडोर’ (असोसिएशन फॉर डायबेटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल) संस्थेच्या मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्रात ३ हजार ५०० रुग्णांनी नोंदणी केली असून, सहा महिन्यांत त्यांचे वजन सरासरी ६.२ किलो कमी झाले आहे. याबरोबरच सुमारे ३९८ मधुमेही रुग्णांचे एचबीएवनसी किमान तीन महिन्यांपासून औषधे बंद होऊन ६.५ पेक्षा कमी झाल्याची माहिती ज्येष्ठ मधुमेह उपचारतज्ज्ञ व दीक्षित आहारपद्धतीचे प्रणेते डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी गुरुवारी दिली.

‘अडोर’ संस्थेच्या मधुमेह मुक्ती समुपदेशन केंद्राद्वारे रुग्णांना अनेक पातळ्यांवर मदत होत असून, या केंद्रात सल्ला घेणाऱ्या एचबीएवनसी दहापेक्षा जास्त असणाऱ्या किमान ३५ ते ४० रुग्णांचा मधुमेह औषधांवाचून नियंत्रणात आला आहे. दीक्षित जीवनशैली अंगिकारल्याने ४ रुग्णांचे तंबाखूचे व्यसन सुटले आहे, असे डॉ. दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब कदम, डॉ. जयंत नवरंगे, डॉ जगन्नाथ दीक्षित आणि डॉ. वेदा नलावडे उपस्थित होते.

डॉ. दीक्षित म्हणाले की, जगभरात मधुमेहाच्या रुग्णांना आयुष्यभर औषधे घ्यावी लागतील, असा सल्ला दिला जातो. असे असताना आमच्या केंद्रात टाइप २ मधुमेह हा बिघडलेल्या जीवनशैलीमुळे होणारा आजार असल्याने तो दीक्षित जीवनशैलीद्वारे जीवनशैली सुधारून औषधांवाचून नियंत्रणात आणता येतो, असा आश्वासक सल्ला दिला जातो. दिवसातून फक्त दोनदा जेवणे आणि ४५ मिनिटे व्यायाम करणे या साध्या सोप्या जीवनशैलीने अनेक वर्षांचा मधुमेह औषधांवाचून नियंत्रणात येतो, असा अनुभव अनेक रुग्णांनी घेतला आहे.

विधी महाविद्यालय रस्त्यावर आता केंद्र

जंगली महाराज रस्ता येथे कार्यरत असलेले ‘अडोर’चे पुण्यातील केंद्र रुग्णांच्या सोयीसाठी आता विधी महाविद्यालय रस्त्यावर नळ स्टॉप येथील ॲपेक्स कॉलनीमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. ही जागा राम पद्मा गोडबोले फाउंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे केंद्र सोमवार ते शनिवार संध्याकाळी ५ ते ९ या वेळात चालू असेल. तसेच, या केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय तपासण्या व समुपदेशन या सेवा पूर्णतः निःशुल्क असतील. ‘अडोर’च्या या समाजोपयोगी कामात यंदाही ‘इन्फोसिस फाउंडेशन’तर्फे आर्थिक मदत करण्यात आली आहे, असे डॉ. दीक्षित यांनी नमूद केले.