पुणे : मुंढवा आणि बोपोडी येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर आता ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची पंधरा एकर जागेची परस्पर विक्री झाल्याचा प्रकार पुढे आला आहे. या बेकायदा जागा विक्रीबाबतची तक्रार विभागीय आयुक्तांकडे करण्यात आल्यानंतर प्रभारी सह दुय्यम निबंधक, वरिष्ठ लिपक विद्या शंकर बडे-सांगळे यांना निलंबीत करण्यात आले आहे.

ताथवडे येथे पशुसंवर्धन विभागाची ७२ हेक्टर (सुमार १७८ एकर) जागा आहे. त्यापैकी एका गटातील पंधरा एकर जागेवर पशुसंवर्धन विभागाचे नाव इतर अधिकारात आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय जमिनीचा व्यवहार करता येत नसतानाही अकरा महिन्यांपूर्वी जागेचा व्यवहार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. संबंधित जागा खासगी मालकीची असली तरी इतर अधिकार पशुसंवर्धन विभागाची अशी नोंद आहे. या जागेसंदर्भात उच्च न्यायालयात संबंधित मालकाने दावा दाखल केला होता. उच्च न्यायालयात दाव्याच्या निकालात मालकीसंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नव्हते. त्यामुळे सातबारा उताऱ्यावर इतर अधिकारात पशुसंवर्धन विभागाचे नाव कायम राहिले आहे. त्यानंतर जानेवारी महिन्यात जागा विक्रीचा व्यवहार करण्यात आला होता.

ही जमीन पशुसंवर्धन विभागाला अंधार ठेवून परस्कर विकण्यात आल्याचे आणि व्यवहाराची कागदपत्रेही तयार करण्यात आली होती. या विक्रीचा दस्त झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळाल्यानंतर विभागीय आयुक्तांनाकडे यासंदर्भातील तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी यासंदर्भात नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे विचारणा केली होती. त्यानुसार दुय्यम निबंधकांवर कारवाईची प्रक्रिया नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर विद्या शंकर बडे यांचे निलंबन करण्यात आले आले आहे. नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी त्यासंदर्भातील लेखी आदेश काढले आहेत.

दस्त नोंदणी करताना अद्यावत किंवा नजकीच्या कालावाधतीली सातबारा उताराला जोडलेला नसल्याची बाब दुर्लक्षित करून पशुसंवर्धन विभागाचा ताबा असलेली आणि शासनाची पूर्व परावनगी न घेता खरेदी विक्रीस बंदी असलेल्या मिळकतीचा खरेदी विक्रीचा दस्ताऐवज नोंदणी केल्याचा ठपका बडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जागेवर पशुसंवर्धन विभागाचा ताबा असताना आणि शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय खरेदी विक्रीस बंदी असा शेरा असतानाही हा व्यवहार करण्यात आल्यामुळे बडे यांचे निलंबन करण्यात आले आहे.