प्रभात रस्ता परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेची पिशवी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.

याबाबत एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला कोथरुड परिसरात राहायला आहेत. त्या प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १४ परिसरातून जात होत्या. सोजस हाऊस इमारतीसमोर दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला.

चोरटे भरधाव वेगाने पसार झाले. पिशवीत ७०० रुपये, छत्री तसेच मोबाइल संच असा मुद्देमाल होता. पोलिसांनी स्वोजस हाऊस इमारत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव तपास करत आहेत.