पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी भिंती भाजपच्या घोषणा आणि निवडणूक चिन्हाने रंगविण्याचा आदेश शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यानुसार घोषवाक्यांनी भिंती रंगविण्यास सुरुवात झाली असून, भाजपच्या ‘बूथ चलो’ अभियानाचा हा एक भाग असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. मात्र भाजप पदाधिकाऱ्यांकडून होणारे रंगकाम वादात सापडण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे: पोलीस आयुक्तांचा वाहतूक पोलिसांना इशारा; म्हणाले, ‘चिरीमिरी घ्याल तर…’

लोकसभेची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने भाजपकडून निवडणूक तयारी सुरू झाली आहे. ग्रामीण भागासाठी गाव चलो अभियान, तर शहरी भागासाठी बूथ चलो अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानासंदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये सार्वजनिक आणि खासगी सोसायट्या, गृहसंकुलांच्या भिंतीवर कमळ हे पक्षचिन्ह, निवडणूक घोषवाक्य रंगविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार शहराच्या भिंतींवर रंगरंगोटी सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> मेट्रो धावली नदीखालून! पुणे मेट्रोची जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गावर चाचणी

‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत शहराचा नावलौकिक वाढावा, यासाठी सार्वजनिक भिंती, रस्ते दुभाजकांची रंगरंगोटी महापालिकेकडून केली जात आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून प्रचारासाठी भिंतींवर ‘कमळा’चे चिन्ह आणि निवडणुकीच्या घोषणांच्या जाहिराती रंगविण्यात येत असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत असल्याची टीका भाजपवर सुरू झाली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागासाठी गाव चलो अभियान, तर शहरी भागासाठी बूथ चलो अभियान हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमाचा भिंती रंगविणे हा एक भाग आहे. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार खासगी जागांवर घोषणा, भाजपचे पक्षचिन्ह रंगविण्यात येत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील पदाधिकाऱ्यांना तशी सूचना करण्यात आली आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune bjp officials get order to paint private walls with slogans and bjp election symbols pune print news apk 13 zws