पुणे : शहराला ऐन उन्हाळ्यात मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शहर जलमय झाले. शहरातील अनेक सखल भागांत आणि रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा फज्जा उडाला. शहरात ३० ठिकाणी झाडपडीच्या, तर सणसवाडी, मंतरवाडी चौक (फुरसुंगी) धानोरी या ठिकाणी होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडल्या. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवीन टर्मिनलमध्येही पाणी साचले. आणखी दोन दिवस पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
शहरात गेल्या तीन दिवसांपासून दुपारनंतर पावसाला सुरुवात होत आहे. मंगळवारी दुपारी चारनंतर वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने पुणेकरांची धांदल उडाली. शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. औंध, सातारा रस्ता, कोथरुड परिसरातील चांदणी चौक, नरवीर तानाजी मालुसरे (सिंहगड) रस्त्यावरील आनंदनगर, माणिकबाग चौकात पाण्याची तळी साचली. त्यामुळे महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांचा फज्जा उडाला.
शहरात ३० हून अधिक ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. शिवाजीनगर रात्री साडेआठपर्यंत २३.६ मिमी, तर रात्री १० वाजेपर्यंत चिंचवड येथे ९३.५ मिमी, हडपसर ६७.५ मिमी, लवळे ३४.२ मिमी, वडगाव शेरी ५८.५, तळेगाव ४० मिमी, कोरेगाव पार्क येथे ९ मिमी पावसाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. तसेच २६ मेपर्यंत शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगाळ राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.