पुणे : शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर पथारी व्यावसायिक तसेच दुकानांसमोरील मोकळ्या आणि आजूबाजूच्या जागेत व्यावसायिकांनी बांधकामे केल्याच्या तक्रारी वाढल्याने महापालिकेने अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे. शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमण विभाग आणि बांधकाम विभागाने एकत्रित कारवाई करत अतिक्रमणे काढून टाकली. १६ मे पर्यंत कारवाई करण्याचे नियोजन महापालिकेने तयार केले आहे.
या दोन्ही विभागांच्या पथकांनी शुक्रवारी शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमणे काढून टाकली. परिमंडळ पाच अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या दोन्ही बाजू शनिवार वाडा ते स्वारगेट येथील देशभक्त केशवराव जेधे चौक रस्त्यावरील विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली. महापालिकेने गेले तीन दिवसांपासून अतिक्रमणांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे व परिमंडळ उपायुक्त सुनील बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त किसन दगडखैर व सुहास जाधव यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
अभय शिंदे, उमेश नरुले, श्रीकृष्ण सोनार, राहुल महाजन, अविनाश इंगोले, सुभाष जगताप, शरद मरकड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत टेबल, खुर्च्या, मंडप, काउंटर असे सुमारे आठ ट्रक पथारी साहित्य जप्त करण्यात आले. तर साडेपाच हजार चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. शहराच्या विविध भागांत पुढील काही दिवसांत ही कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे उपायुक्त खलाटे यांनी सांगितले.
नगर रस्त्यावरही झाली कारवाई
नगर रस्त्यावरील खराडी झेन्सार आयटी पार्क परिसरातील व खराडी मुंढवा बायपास रस्त्यावरील अतिक्रमणांवरही शुक्रवारी हातोडा मारण्यात आला. नगर रस्ता वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त संजय पोळ यांच्या नेतृत्वाखाली उमेश गोडगे, मंगेश गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाई ३४ काउंटर, आठ हातगाड्या, सिलिंडर, पथारी, खुर्च्या, टेबल, जाळ्या हे साहित्य जप्त करण्यात आले.