पुणे : पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडाला गुन्हे शाखेने कोथरूड भागात पकडले. अक्षय शांताराम सावंत (वय ३०, रा. शिवणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सावंत याला शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.

कोथरूड येथील सागर कॉलनीमध्ये १८ जून रोजी सावंत हा त्याच्या काकाच्या घरी आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सागर कॉलनीत सापळा लावला. पोलिसांना पाहताच तो पळाला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. सावंत याला ११ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन वर्षांसाठी पुणे शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या आदेशाचा भंग करुन तो शहरात आला होता. त्याला कोथरूड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, सहायक फौजदार पंढरीनाथ शिंदे, मुकुंद तारू, पोलीस कर्मचारी अमोल काटकर, विशाल भिलारे, अक्षय गायकवाड, अर्चना वाघमारे आणि पथकाने ही कामगिरी केली.