पुणे : राज्यात अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेत नियमित फेऱ्या संपल्यानंतर आता संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मात्र, संस्थास्तरावर होणारी प्रवेश प्रक्रिया नियमानुसार होते की नाही, याची झाडाझडती घेतली जाणार आहे. त्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) पुण्यातील नामांकित संस्थांच्या २९ महाविद्यालयांवर निरीक्षक नियुक्त केले असून, संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेचे निरीक्षण करून सविस्तर अहवाल १६ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) राज्यात अभियांत्रिकी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यात केंद्रीभूत प्रवेश फेऱ्या संपल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर महाविद्यालय स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. ही प्रक्रिया माहिती पुस्तिकेतील प्रवेश प्रक्रियेच्या नियम क्रमांक १३; तसेच १५ नुसार म्हणजेच गुणवत्तेनुसार राबवणे अनिवार्य आहे. मात्र, महाविद्यालय स्तरावरील प्रवेश प्रक्रिया नियम डावलून, पैसे आकारून केली जात असल्याची तक्रार विद्यार्थी, पालकांसह युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे केली होती. या पार्श्भूमीवर, तंत्रशिक्षण संचालनालयाने पुणे विभागातील ३२ महाविद्यालयांवर निरीक्षक नियुक्त केले असून, त्यातील २९ महाविद्यालये पुणे शहर, पिंपरी चिंचवड, जिल्ह्यातील आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील अभियांत्रिकी पदवी (बीई.बीटेक) या अभ्यासक्रमासाठी संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिया ८ ते १५ सप्टेंबर या कालावधीत राबवण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पदवी, पदव्युत्तर पदवी प्रवेश माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक १३ नुसार संस्थास्तरावरील प्रवेश पारदर्शकतेने व गुणवत्तेनुसार देण्यात येतात किंवा कसे या बाबतचे निरीक्षण करण्यासाठी निरीक्षक नियुक्त करण्यात येत आहेत. नियुक्त केलेल्या निरीक्षकांनी त्यांना नेमून दिलेल्या संस्थेत उपस्थित राहून सीईटी सेलच्या प्रवेश माहिती पुस्तिकेतील नियम क्रमांक १३ मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार प्रवेश देण्यात येतात का, किंवा कसे या बाबतचे निरीक्षण करून आवश्यक कागदपत्रांसह सविस्तर अहवाल १६ सप्टेंबरपर्यंत सादर करावा, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. पुणे विभागात ३२ महाविद्यालये आणि संबंधित महाविद्यालयांमध्ये नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक, त्यांचे संपर्क क्रमांक याची यादी https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.