पुणे : शहरातील अनेक रस्त्यांवरील पदपथांची दुरवस्था झालेल्या तक्रारींची दखल घेऊन पदपथांची पाहणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ‘मिशन १५’ आणि ‘मिशन १७’ अंतर्गत कामे करण्यात आलेल्या २८ रस्त्यांची पाहणी केली जाणार आहे. पथ विभागातील ५५ अधिकारी ही पाहणी करणार असून, त्याचा अहवाल तीन दिवसांनी होणाऱ्या बैठकीत ठेवला जाणार आहे.

शहरातील अनेक रस्त्यांवर पदपथ अस्तित्वातच नाही. त्यामुळे पायी चालणाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. यामुळे काही अपघातदेखील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथ विभागाने शहरात चालण्यास योग्य व अयोग्य पदपथांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली. पथ विभागाच्या वतीने पदपथांचे स्थापत्य लेखापरीक्षण केले जाणार आहे. यासाठी २८ रस्ते निवडण्यात आले आहेत. या रस्त्यांची लांबी १५० ते १७५ किलोमीटर इतकी आहे.

प्रत्येक अभियंत्याला ३ ते ४ किलोमीटर रस्त्याची पाहणी करावी लागणार आहे. या पाहणीत पदपथांची अवस्था काय आहे, याचा सविस्तर अहवाल तयार करून तो पुढील तीन दिवसांत सादर करावा लागणार आहे. हा अहवाल मिळाल्यावर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना पथपथ दुरुस्तीच्या सूचना देणार असल्याचे पावसकर यांनी सांगितले.

शहरातील पदपथ नागरिकांना चालण्यासाठी योग्य आहेत की नाही, याची पाहणी केली जाणार आहे. यासाठी ५५ अभियंत्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. हे अभियंते पदपथांची पाहणी करून अहवाल सादर करणार आहेत. – अनिरुद्ध पावसकर, मुख्य अभियंता, पथ विभाग

उत्सवाच्या काळातील नियोजन सुरू

आगामी गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास नागरिकांना होऊ नये तसेच उत्सवाच्या काळात रस्ते सुस्थितीत राहावे यासाठी पथ विभागाने नियोजन केले आहे. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, यासह कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि अन्य महत्त्वाच्या रस्त्यांची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यांकडे देण्यात आली आहे. तसेच गणेश मंडळांसाठी देखील महापालिकेने नियमावली जाहीर केली आहे.

मांडव टाकण्यासाठी खोदलेले खड्डे स्वखर्चाने बुजवावेत, उत्सवानंतर तीन दिवसांत मंडप, सजावट तसेच इतर अतिक्रमण काढून तातडीने जागा माेकळी करावी अशा सूचनांचा या नियमावलीत समावेश आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीमध्ये २०२२ पासून पाच वर्षापर्यंत मंडप, कमानी यासाठी परवानगी घ्यावी लागणार नाही. नवीन गणेश मंडळांना मात्र २०१९ च्या नियमावलीनुसार परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच विविध परवानगी घेण्यासंदर्भात पाेलीस, महापालिका यांनी एक खिडकी याेजना सुरु करणार आहे.

येथे नोंदवा तक्रार

वाहतुकीला अडथळा हाेणार नाही, तसेच त्यांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तसेच तक्रारीसाठी महापालिकेने हेल्पलाईन सुरु केली आहे. नागरिकांना http://complaint.punecorporation.org, या संकेतस्थावर तसेच टोल फ्री क्रमांक १८०० १०३ ०२२२, माेबाईल अँप : PUNE Connect, व्हॉट्स अप नंबर : ९६८९९००००२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.