पुणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) केेलेल्या कारवाईत शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या सराइताला गांजा तस्करी प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाने गजाआड केले. त्याच्याकडून पाच लाख ३६ हजार रुपयांचा २६ किलो गांजा, मोटार, मोबाइल संच असा २१ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अनिल उर्फ अण्णा सुभाष राख (वय ४६, रा. काळेपडळ, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये राख याच्याविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राख हा सराइ आहे. हडपसर भागातील खून प्रकरणात २०१४ मध्ये त्याच्याविरुद्ध मकोका कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात त्याला शिक्षा झाली होती. शिक्षा भोगून तो कारागृहातून सहा ते सात महिन्यांपूर्वी बाहेर आला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने गांजाची तस्करी सुरू केल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांनी दिली.
अमली पदार्थ विरोधी पथक फुरसुंगी भागात गस्त घालत होते. त्या वेळी राख हा मोटारीतून कात्रज-मंतरवाडी रस्त्यावर मोटारीतून आला होता. त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. मोटारीतून २६ किलो गांजा जप्त करण्यात आला. राखने गांजा कोणाकडून आणला, तसेच तो काेणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, प्रविण उत्तेकर, विनायक साळवे, विशाल दळवी, सचिन माळवे, नागेश राख, संदीप शिर्के, सुहास डोंगरे, दत्ताराम जाधव, दयानंद तेलंगे-पाटील आणि पथकाने ही कारवाई केली.
गांजाला मागणी
शहरात गांजा विक्री, तस्करीचे प्रकार वाढले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ विरोधी तस्करांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गांजा अन्य अमली पदार्थांच्या तुलनेत स्वस्त आहे. त्यामुळे गांजाला मागणी वाढती आहे. सराइत, तसेच महाविद्यालयीन युवकांकडून गांजा ओढला जातो. अल्पवयीन मुले गांजा ओढत असल्याचे दिसून आले आहे. अन्य अमली पदार्थांच्या तुलनेत गांजा तस्करी आणि विक्रीचे प्रमाण जास्त आहे.