पुणे : नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यात होणाऱ्या पुणे ग्रॅण्ड टूर सायकल स्पर्धेचे अंतर २३३ किलोमीटरने कमी करण्यात आले आहे. डोंगरमाध्यावरील वळणावळणाचे रस्ते, चढ-उतार आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक अंतर कमी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आता या स्पर्धेचा मार्ग ६७० किलोमीटरऐवजी ४३७ किलोमीटर अंतराचा झाला आहे.

भारतीय सायकल फेडरेशन तसेच युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल (यूसीआय) या आंतरराष्ट्रीय सायकलिंग संघटनेने केलेल्या सूचनांनुसार, ज्या मार्गांवर चढ आहे आणि सायकलपटूंना मार्गक्रमण करताना धोकादायक ठरू शकतात, अशा मार्गांचा स्पर्धेत समावेश करू नये. त्यानुसार या मार्गांची लांबी कमी करण्यात आल्याचे जिल्हाधिकीरी डुडी यांनी सांगितले.

डुडी म्हणाले, ‘ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखली जाणार असून ‘यूसीआय’च्या दिनदर्शिकेत समावेश झाल्यानंतर केवळ दोनच दिवसांत सुमारे १४ देशांनी आपले प्रतिनिधी पाठविण्यास होकार दर्शविला आहे. भारताच्याही दोन पथकांचा यात समावेश असेल, असे सायकल फेडरेशनने स्पष्ट केले आहे. स्पर्धेमध्ये किमान २०० आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेची अधिकृत घोषणा १ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे, तर २८ डिसेंबर रोजी राष्ट्रीय सायकल स्पर्धाही याच मार्गावर घेण्यात येणार आहे.’

त्यानुसार पुणे व पिंपरी-महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या स्पर्धेसाठीच्या ४३७ किलोमीटर रस्त्यांची कामे तातडीने करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पुढच्या अडीच महिन्यांत रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्टही त्यांना देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून १ ऑक्टोबर रोजी घोषणा

या स्पर्धेची अधिकृत घोषणा १ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी स्पर्धेचे बोधचिन्ह (लोगो), सन्मान चिन्ह तसेच भारतीय संघाच्या ‘जर्सी’चे अनावरण करण्यात येणार आहे. यंदा ही स्पर्धा चार भागांमध्ये घेतली जाणार आहे. भविष्यात ही स्पर्धा आठ भागांमध्ये करण्याचा मानस आहे, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.