पुणे : महिलेला धमकावून जमीन बळाकाविण्याचा प्रयत्न करणारा हडपसरमधील सय्यदनगर भागातील गुंड टिपू पठाण याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टिपू पठाण याची हडपसर भागातील सय्यदनगर भागात दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, खंडणी मागणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पठाण याच्यासह साथीदारांविरुद्ध दाखल आहेत. पठाणने एका महिलेला धमकावून तिची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी त्याच्यासह साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल केला होता. पठाण याने एका कार्यक्रमात नोटांची उधळण करुन समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित झाली होती. पोलिसांनी पठाण आणि साथीदारांची धिंड काढली होती, तसेच त्याने कोणाला धमकावले असल्यास तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. पठाण याच्यासह साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करण्याचा प्रस्ताव काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी तयार केला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजूरी दिली.

त्यानंतर रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण (वय ३४, रा. ख्वाजा मंझिल, सय्यदनगर, हडपसर) याच्यासह एजाज सत्तार पठाण (वय ३९), नदीम बाबर खान (वय ४१), सद्दाम सलीम पठाण (वय २९), एजाज युसूफ इनामदार-पटेल (वय ३३), इरफान नासीर शेख (वय २६), साजीद नदाफ (वय २६, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध ‘मकोका’ कारवाईचे आदेश देण्यात आले.

लोणी काळभोरमधील टोळीला ‘मकाेका’

लोणी काळभोर भागात दहशत माजविणारा गुंड फिरोज महमंद शेख (वय २९), प्रसाद दत्तात्रय जेठीथोर (वय २०), अस्लम अन्वर शेख, आदित्य प्रल्हाद काळाणे (सर्व रा. लोणी काळभोर) यांच्याविरुद्ध मकोका कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. गेल्या चार महिन्यात परिमंडळ पाचमधील सहा गुंड टोळ्यांविरुद्ध पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मकोका’ कारवाई करण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune hadapsar sayyed nagar goon tipu pathan mcoca for illegally grabbing land of a woman pune print news css