रस्त्यांवर साठलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालक नागरिकांची तारांबळ

पुणे : शहर आणि परिसरात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. पाणी वाहून जाण्याची व्यवस्था असलेल्या पावसाळी वाहिन्यांवर कचरा साठल्याने पाणी वाहून जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. रस्त्यावर साठलेले पाणी वाहून जात नसल्याने गुडघा भर पाण्यामधून नागरिकांना आणि वाहन चालकांना मार्ग काढावा लागत आहे.

शहरातील अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाल्याच्या तक्रारी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागात सह मदत कक्षाकडे येत आहेत. रस्त्यावर साठलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि हे पाणी वाहून जावे यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर उतरून साठलेले पाणी वाहून जावे यासाठी प्रयत्न करत आहेत. पावसाळी वाहिन्यांवरील कचरा काढून टाकला जात आहे.

तुंबलेली गटारे, पावसाळी गटारे तसेच ड्रेनेज लाईनची स्वच्छता करण्यास महापालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. महापालिकेने सुरू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचारी, अधिकारी शहरातील सर्व भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ज्या भागातून पाणी साठल्याच्या तसेच पावसाळी गटारे तुमच्या तक्रारी येत आहेत येथे महापालिकेची पथके, मल:निस्सारण, तसेच विविध खात्यांमधील कर्मचारी घटनास्थळी पाठविले जात आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी यांनी दिली.

महापालिकेच्या मुख्य खात्यातील कर्मचाऱ्यांच्या पथकांबरोबरच १५ क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पथके घटनास्थळी नेमण्यात आली आहेत. हडपसर भागातील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने येथे विशेष काळजी घेतली जात आहे. यासह सय्यद नगर रेल्वे गेट, घोरपडी पेठ, गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन परिसरात रस्त्यावर साठलेल्या पाण्याचा निचरा कसा होईल, यासाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पावसाचे पाणी रस्त्यांवर साठल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

साठलेल्या पाण्यातून वाहने काढताना नागरिकांची आणि वाहन चालकांची चांगली तारांबळ उडत आहे. दरम्यान, मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. शहर आणि जिल्ह्यातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. थेऊरमध्ये ५० घरांमध्ये पाणी शिरले असून घटनास्थळी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे काम सुरू आहे.