पिंपरी : बालेवाडी येथील एका गॅस सर्व्हिस सेंटरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरमधून इतर सिलेंडरमध्ये अवैध रिफिलिंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील पोलीस शिपाई अमोल गोरे यांनी बावधन पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सेंटर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरमधून रिफिलिंग करणे हे अत्यंत धोकादायक असून ज्वालाग्राही पदार्थांबाबत आवश्यक ती खबरदारी न घेता, जाणीवपूर्वक इतर सिलेंडरमध्ये आरोपी गॅस भरत होता. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी सेंटर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

देहूरोडमध्ये मटका जुगार अड्ड्यावर छापा देहूरोड परिसरातील गांधीनगर भागात मटका जुगार खेळत असलेल्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकला. सहा आरोपींकडून सहा हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.या प्रकरणी पोलीस शिपाई पंकज भदाने यांनी देहूरोड पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी मटका जुगाराचे आकडे लिहून घेऊन पैसे खेळताना आढळून आले. ते मुंबई- कल्याण मटका नावाचा मटका खेळत होते. याबाबत माहिती मिळाली असता देहूरोड पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून कारवाई केली. त्यांच्याकडून सहा हजार ७२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

रासे येथे दारूभट्टीवर छापा

खेड तालुक्यातील रासे येथे ओढ्याच्या बाजूला सुरु असलेल्या दारू भट्टीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने छापा मारला. या कारवाई मध्ये दोन लाख ८७ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.पोलीस शिपाई अमर कदम यांनी चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपीने रासे गावात ओढ्याच्या काठावर दारूभट्टी लावली. याबाबत मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला माहिती मिळाली. पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी दोन लाख ८७ हजार रुपये किमतीचे आठ हजार २०० लिटर रसायन नष्ट केले. 

बसच्‍या धडकेत दुचाकीस्वार जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव वेगातील बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका तरुणाचा हात फॅक्चर झाला. हा अपघात सोमवारी सकाळी चाकण जवळ वाकी खुर्द येथे घडला. नरेश गजानन बाविस्वर (वय २९, वाकी, खेड) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, नरेश दुचाकीमध्ये हवा भरण्यासाठी पुणे-नाशिक महामार्गाने जात होते. चाकण जवळ वाकी खुर्द येथे भरधाव ट्रॅव्हल्स बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांच्या उजव्या हातावरून बसचे चाक गेल्याने हात व बोटांना गंभीर फ्रॅक्चर झाले.