पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर स्फोटकांद्वारे उडविण्याच्या धमकीचा ‘ई-मेल’ एका खासगी विमान कंपनीला पाठविण्यात आल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), दहशतवादविरोधी पथक (एटीएस), बाॅम्बशोधक आणि नाशक पथक (बीडीडीएस) आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने तपासणी केली. त्यानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. याचा विमान उड्डाणांवर परिणाम झाला नाही.

या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ परिसरात ‘सीआयएसएफ’ची सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे.

‘या प्रकारानंतर हवाई उड्डाणांवर फारसा परिणाम झाला नाही. प्रवासी घाबरून जाऊ नयेत म्हणून तपासणी करण्यात आली. नियोजनानुसार विमानांची उड्डाणे झाली,’ असे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितले.