पुणे : शिक्षणाचे माहेरघर, माहिती तंत्रज्ञानाचे शहर, (आय. टी. सिटी) अशी ओळख असलेल्या पुणे शहराची ओळख आता हळूहळू पुसू लागली आहे. वाहनांची वाढणारी संख्या, रस्त्यांवर होणारी वाहतुकीची कोंडी याबरोबरच रस्त्यावर पडलेले खड्डे आणि सतत विविध कामांसाठी खोदले जाणारे रस्ते यामुळे पुणे शहरातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब अशी झालेली आहे.

शहरातील रस्त्यांच्या या दयनीय अवस्थेचा फटका अवघ्या १५ ते २० दिवसांनी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला बसेल की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षी ‘ पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा ‘ घेतली जाते. विविध देशातील स्पर्धक या मॅरेथॉन मध्ये भाग घेण्यासाठी दरवर्षी पुणे शहरात मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

यावर्षी मॅरेथॉन स्पर्धा ७ डिसेंबरला आयोजित करण्यात आलेली आहे. यंदा या स्पर्धेचे ३९ वे वर्ष आहे. ४२ किलोमीटर, २१ किलोमीटर आणि १० किलोमीटर अंतरासाठी ही मॅरेथॉन स्पर्धा होते. मोठ्या संख्येने पुणेकर नागरिकांसह विविध भागातील उत्साही स्पर्धक, नागरिक यामध्ये सहभागी होतात. गेल्या अनेक वर्षापासून कोणत्याही खंड न पडता ही स्पर्धा आयोजित केली जात असल्याने तिचे विशेष महत्व आहे.

भारताच्या मॅरेथॉनची जननी असलेली आणि पुण्याचा नावलौकिक जागतिक क्रीडा नकाशावर नेणारी अशी ओळख ‘ पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ‘ स्पर्धेची आहे. मात्र यंदाच्या वर्षी शहरातील विविध भागात सुरू असलेल्या रस्त्यांच्या खोदकामामुळे तसेच रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक असलेल्या या स्पर्धेला काही प्रमाणात फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील अनेक भागांतील रस्ते विविध विकास कामे करण्यासाठी खोदण्यात आलेले आहेत, फुटपाथ देखील खोदण्यात आले असून अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे.

विकास कामे करण्यासाठी खोदलेले रस्ते पुन्हा योग्य पद्धतीने बुजविण्यात न आल्याने अनेक भागात खोदलेल्या रस्त्यांवरील माती, वाळू, खडी सर्वत्र पसरलेली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यातच यंदाच्या वर्षीच्या मॅरेथॉनच्या मार्गात काही प्रमाणात बदल करून ही मॅरेथॉन मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरून नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक रस्त्यांवर सध्या सीसीटीव्ही केबल, समान पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिनी टाकण्याची कामे सुरू आहेत. तर काही रस्ते दोन महिन्यानंतर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी तयार केले जात असल्याने त्यांची कामे सुरू आहेत. या सर्वांचा फटका या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला बसण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता या रस्त्यांसह अनेक रस्ते खोदण्यात आलेले आहेत. तर काही रस्त्यांवरील वर खाली झालेले चेंबर्स एकसमान करण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनासमोर आहे. या मुदतीत ही कामे पूर्ण न झाल्यास त्याचा त्रास आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या खेळाडूंना आणि उत्साही नागरिकांना बसू शकतो. ही कामे अपूर्ण अवस्थेत राहिल्यास यंदाची मॅरेथॉन खड्ड्यांच्या रस्त्यातून धावून पूर्ण करण्याचे आव्हान खेळाडूंना घ्यावे लागणार आहे.

शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थेबाबत सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी महापालिकेच्या कामावर टिकास्त्र सोडले. वेलणकर म्हणाले, अनेक रस्त्यांचे खोदकाम सुरू आहे. फुटपाथ खोदलेले आहेत. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेसाठी वेगवेगळ्या देशातील खेळाडू यांच्यासह पुण्यातील प्रतिष्ठित नागरिक, उत्साही नागरिक स्पर्धेच्या निमित्ताने एकत्र येतात. या सर्वांना महापालिका प्रशासन खोदलेले रस्ते आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था दाखविणार आहे का?

हेही वाचा

सध्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे अशा रस्त्यांवरून धावून खेळाडूंसह नागरिकांनाही दुखापत झाल्यावर त्याची जबाबदारी महापालिका घेणार आहे का? रस्त्यांची अवस्था स्पर्धेपर्यंत अशीच राहिल्यास पुणे शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर खाली घालविण्याचा प्रकार आहे. ही स्पर्धा मध्यवर्ती भागात न घेता ज्या ठिकाणी चांगले रस्ते आहे आणि पळताना खेळाडूंना त्रास होणार नाही अशा रस्त्यांवरच घेणे गरजेचे आहे. अन्यथा महापालिकेच्या या कारभारामुळे शहराचे नाव खराब होईल, असेही वेलणकर म्हणाले.

महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, मध्यवर्ती भागातील काही रस्ते विकास कामांसाठी खोदण्यात आलेले आहेत. मात्र त्यांची डागडुजी, दुरुस्ती केली जात आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या सायकल स्पर्धेसाठी काही रस्ते गुळगुळीत बनवले जात आहे मात्र त्याचा मॅरेथॉनच्या स्पर्धकांना कोणताही त्रास होणार नाही. काही भागातील फुटपची कामे अर्धवट आहे ती पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा यंदा असा आहे मार्ग ?

सारसबागे जवळील सणस मैदान समोरून यंदा मॅरेथॉन सुरुवात होणार आहे. सलग चौक बाजीराव रस्ता, नगरकर तालीम, लक्ष्मी रोडने, टिळक चौक येथून वळसा घालून पुन्हा बाजीराव रस्त्यावरून आप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, शिवाजी पूल, महापालिका भवन, मॉडर्न कॅफे तेथून पुन्हा जंगली महाराज रस्त्याने बालगंधर्व चौक, डेक्कन जिमखाना, संभाजी महाराज पुतळा, खंडोजी बाबा चौकातून कर्वे रस्ता, गरवारे कॉलेज, एसएनडीटी महाविद्यालय, दशभूजा गणपती मार्गे मृत्युंजय मंदिर, कर्वे पुतळा, करिष्मा बिल्डिंग या रस्त्याने पुढे डीपी रोड, म्हात्रे पूल तेथून पुन्हा वळसा घालून पंडित फार्म , राजाराम पूल पुढे नरवीर तानाजी मालुसरे रस्ता, पु. ल. देशपांडे उद्यान, गणेश मळा, पानमळा, दांडेकर पूल, निलायम टॉकीज पुलाखालून सारसबागेजवळ येऊन ही मॅरेथॉन संपणार आहे.