पुणे : बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रूग्णालयातील आंतरवासिता डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नसल्याने त्यांनी मंगळवारपासून संप पुकारला होता. महाविद्यालय प्रशासनाने आठवडाभरात वेतन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंतरवासित डॉक्टरांनी संप मागे घेतला.

बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयात २३५ आंतरवासिता डॉक्टर आहेत. हे विद्यार्थी ५ एप्रिलपासून आंतरवासिता प्रशिक्षणासाठी महाविद्यालयात रूजू झाले आहेत. त्यांना अद्यापपर्यंत एप्रिल, मे आणि जून महिन्याचे विद्यावेतन मिळालेले नाही. त्यामुळे या आंतरवासिता डॉक्टरांनी मंगळवारपासून संप पुकारण्याची घोषणा केली. त्यांनी महाविद्यालयासमोर निदर्शनेही केली. त्यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांनी आंतरवासिता डॉक्टरांशी चर्चा केली. अधिष्ठात्यांनी आठवडाभरात विद्यावेतन देण्याचे आश्वास दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.

आंतरवासिता डॉक्टरांनी महाविद्यालय प्रशासनाला पाठविलेल्या पत्रात अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यात त्यांनी एकाच बँकेत खाते उघडण्याची सक्ती नको, वेतन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नसणे, वारंवार विद्यावेतन देण्याचे आश्वासन देऊनही त्याचे पालन न होणे, विद्यार्थ्यांना आंतरवासिता प्रशिक्षणाचे अर्ज भरून देण्यास उशीर केल्याचा आरोप करणे असे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. आंतरवासिता डॉक्टरांचे प्रलंबित विद्यावेतन १८ जुलैपर्यंत न मिळाल्यास बेमुदत संप करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

आंतरवासिता डॉक्टरांनी त्यांचे आंतरवासिता प्रशिक्षण एप्रिलमध्ये सुरू झाले. मात्र त्यांनी आंतरवासिता प्रशिक्षणाचे अर्ज भरून देण्यास ३१ मेपर्यंत विलंब लावला. त्यामुळे त्यांच्या विद्यावेतनाची प्रक्रिया सुरू होण्यास जून उजाडला. जूनमध्ये त्यांच्या विद्यावेतनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या आठवड्यात त्यांना प्रलंबित विद्यावेतन मिळेल. – डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालय.

डॉक्टरांची भूमिका

आम्ही बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोपचार रुग्णालयातील २३५ आंतरवासिता डॉक्टर आमच्या प्रलंबित विद्यावेतनाबाबत गंभीर चिंता व्यक्त करीत आहोत. प्रत्येक आंतरवासिता डॉक्टरला दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन नियमानुसार मिळणे अपेक्षित आहे, परंतु ५ एप्रिलपासून हे विद्यावेतन प्रलंबित आहे. या विलंबामुळे आम्हाला गंभीर आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.

त्यातून आमच्या दैनंदिन जीवनावश्यक खर्च भागवण्याची क्षमता बाधित झाली आहे. तरीही, आम्ही आमच्या आंतरवासिता कर्तव्यांचे पालन प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करत आहोत. आमच्या प्रलंबित विद्यावेतनासाठी अखेर आम्हाला संप पुकारण्याचे पाऊल उचलावे लागले.