पुणे : रस्त्याकडेला कोळशाची इस्त्री लावून काम करणारे इस्त्रीवाले नेहमीच दिसतात. आता हे चित्र बदलू लागले आहे. इस्त्रीवाल्यांच्या आयुष्यात बदल घडविण्याचे काम इस्त्री प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत इस्त्रीवाल्यांना एलपीजी इंधनावर चालणाऱ्या इस्त्री पेट्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यातून त्यांचा इंधनखर्च जवळपास निम्म्याने कमी होऊन रोजच्या उत्पादनक्षमतेत दोन तासांची वाढ होत आहे.

उद्यम व्यापारकडून इस्त्री प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून पारंपरिक कोळशावरील इस्त्री उद्योगात बदल घडवून आणला जात आहे.रस्त्यालगत इस्त्री करणाऱ्या व्यावसायिकांना अनुदानित दरात एलपीजीवर चालणाऱ्या इस्त्री पेट्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

कोळशावरील इस्त्री गरम करण्यात इस्त्रीवाल्यांचा दररोज सुमारे दोन तास वेळ जातो. आता दोन मिनिटांत इस्त्री गरम होत असून, त्यांची उत्पादकताही वाढली आहे. ते अधिक ग्राहकांना सेवा देऊ शकतात आणि अतिरिक्त उत्पन्नही मिळवू शकतात. कोळशाऐवजी एलपीजीचा वापर केल्याने स्वच्छ इंधनाचा पर्याय मिळतो. यामुळे त्यांच्या आरोग्यावरच नव्हे, तर पर्यावरणावर होणारा दुष्परिणामही कमी होतो.

गेल्या चार वर्षांत उद्यम व्यापारच्या इस्त्री प्रकल्पाचा विस्तार बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, दिल्ली या पाच शहरांत झाला आहे. आतापर्य़ंत ८ हजारांहून अधिक इस्त्री व्यावसायिकांना या फायदा झाला आहे. या प्रकल्पामुळे इस्त्रीवाल्यांच्या उत्पन्नात सरासरी २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर दर वर्षी ६ हजार टनांहून अधिक कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होण्यासही मदत झाली आहे.

याबाबत उद्यम लर्निंगचे सहसंस्थापक कृष्णन रंगनाथन म्हणाले, की लघुउद्योजक हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. योग्य आधार मिळाल्यास ते लोकसंख्येतील मोठ्या घटकांचे जीवनमान सुधारू शकतात. इस्त्री प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही यंदा सप्टेंबरअखेरपर्यंत इस्त्रीवाल्यांच्या उत्पन्नात १०० कोटी रुपयांची वाढ करू शकलो आहोत. ही केवळ आमच्यासाठीच नाही, तर बदल स्वीकारणाऱ्या हजारो इस्त्री व्यावसायिकांना अभिमानाची बाब आहे. स्थानिक उपजीविकेच्या उपाययोजना राष्ट्रीय स्तरावर परिणाम घडवू शकतात आणि एकाच वेळी उत्पन्न, आरोग्य व पर्यावरणीय परिणामांमध्ये सुधारणा घडवू शकतात, हे यातून समोर आले आहे.

कोळशाऐवजी एलपीजीचा वापर स्वीकारून इस्त्रीवाले त्यांच्या व्यवसायातून काय साध्य करू शकतात, हे या प्रकल्पातून समोर आले आहे. इस्त्रीवाल्यांचा इंधनखर्च वाचविण्यास मदत करणे आणि त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, असा साधा हेतू या प्रकल्पामागे होता. आज हा प्रकल्प त्यांच्या व्यवसायात प्रगती करण्यासोबत पर्यावरणरक्षणाचेही काम करीत आहे. – सिरिल जोसेफ, कार्यक्रम प्रमुख, इस्त्री प्रकल्प