पुणे : लक्ष्मी रस्ता परिसरात एका खाद्यपदार्थ विक्रेत्याचा मोबाइल संच हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.चोरट्यांकडून दुचाकी आणि मोबाइल संच जप्त करण्यात आला.

रियाज मुझम्मील खान (वय १९), अयान जावेद शेख (वय १९, दोघे रा. अंगारशहा तकिया, भवानी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खान आणि शेख यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तक्रारदार खाद्यपदार्थ विक्रेता मूळचा परराज्यातील आहे. तो लक्ष्मी रस्त्यावर कणीस विक्रीचा व्यवसाय करतो. गेल्या महिन्यात ३० जुलै रोजी रात्री बाराच्या सुमारास तो काम संपवून घरी निघाला होता. त्या वेळी तो मोबाइलवर आईशी बोलत होता. लक्ष्मी रस्त्यावर दुचाकीस्वार चोरटे खान, शेख आणि त्यांच्याबरोबर असलेला अल्पवयीन साथीदाराने त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेला होता.

या घटनेनंतर खाद्यपदार्थ विक्रेत्याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तपास पथकाने लक्ष्मी रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तसेच मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. मोबाइल हिसकावणारे चोरटे भवानी पेठेतील अंगारशहा तकिया परिसरातील असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी आशिष खरात, अनिस शेख, राहुल मोरे, शिवदत्त गायकवाड यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून खान, शेख आणि अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी लक्ष्मी रस्त्यावर एकाचा मोबाइल संच हिसकावून नेल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून एक मोबाइल संच आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

आरोपींनी मोबाइल हिसकावण्याचे आणखी किती गुन्हे केले, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके, सहायक निरीक्षक राजेश उसगावकर, पांडुरंग वाघमारे, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, अर्जुन थोरात, नितीन बाबर, सागर मोरे यांनी ही कामगिरी केली.

शहरात पादचाऱ्यांकडील मोबाइल संच, तसेच महिलांकडील दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानकासह शहरातील वेगवेगळ्या भागात पादचारी नागरिकांकडील मोबाइल संच हिसकावून नेले जातात. मोबाइल हिसकावून नेण्याच्या किमान दोन ते तीन घटना शहरात दररोज घडतात.