पुणे : आजच्या काळातला रावण म्हणजे फेक नॅरेटिव्ह आहे. या रावणाच्या बेंबीत बाण मारायचा आहे. त्यामुळे फेक नॅरेटिव्हला थेट नॅरेटिव्हने उत्तर देण्याची इकोसिस्टिम आपण तयार करतो आहोत. त्यासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज आहे. खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचे आहे. त्यासाठी आता आदेशाची वाट पाहू नका. मैदानात उतरा आणि हवी तशी बॅटिंग करा. फक्त हिट विकेट व्हायचे नाही, सेल्फ गोल करायचा नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना प्रचारासाठी मैदानात उतरण्याचे आवाहन केले. काहीवेळा दुसऱ्यांवर बोलताना स्वतःवर बोलले जाते, त्याचे स्पष्टीकरण चार दिवस देत राहावे लागते असा टोलाही त्यांनी हाणला.

भाजपचे पुण्यातील बालेवाडी येथे महाअधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा : “महाविकास आघाडीचा इतिहास योजना बंद करण्याचा”; देवेंद्र फडणवीसांचं टीकास्र; म्हणाले, “लाडकी बहीण…”

फडणवीस म्हणाले, की आज हिंदुंना, शिवप्रेमींना दहशतवादी म्हटले जाते. आज जागो झालो नाही, तर जागे होण्याची संधीही मिळणार नाही. आपल्या हिंदुत्त्वाबद्दल अपराधबोध ठेवण्याची गरज नाही. फेक नॅरेटिव्ह हा आजचा रावण आहे, त्याच्या बेंबीत बाण मारायचा आहे. केवळ दोन लाख मतांचा फरक आहे, पण लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हाच दोन लाख मते वाढली आहेत.

हेही वाचा : विधानसभेसाठी भाजपकडून आता २०० पारचा नारा

अलीकडे काम करणाऱ्यांपेक्षा सल्ले देणारे वाढले आहेत. नेत्यांकडून काही चुका झाल्या असतील तर कार्यकर्त्यांनी पोटात घ्याव्यात. नकारात्मक बोलून निष्ठेने काम करणाऱ्यांच्या मनात विष कालवू नका. कमी जागा मिळाल्यावरही कोण बरोबर राहतो हे महत्त्वाचे आहे. पावणे दोन कोटी मते घेतल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री कोण हा प्रश्न आता विचारू नका. मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आहे. महायुतीचे सरकार आणणे एवढेच लक्ष्य आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.