पुणे : जिल्ह्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधी हा आशेचा किरण बनला आहे. या निधीतून यंदा जानेवारी ते जून या कालावधीत जिल्ह्यात पावणेदोन हजारांहून अधिक रुग्णांना १७ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून वैद्यकीय उपचाराकरिता सद्य:स्थितीत पुणे जिल्ह्यात ४४५ रुग्णालये संलग्नित आहेत.

मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचारासाठी मदत करण्यात येते. मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून २५ हजार रुपये, ५० हजार, १ लाख आणि जास्तीत जास्त २ लाख रुपयांची आजारनिहाय मदत करण्यात येते. आता जिल्हास्तरीय मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. दुर्धर आजारावरील उपचारांसाठी मदत, तसेच आपत्तीमध्ये देण्यात येणारे आर्थिक साहाय्य याबाबत नागरिकांना जिल्हास्तरावर सुविधा देण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून होत आहे. साहाय्यता निधीतून पुणे जिल्ह्यात मागील सहा महिन्यांत १ हजार ७८५ रुग्णांना १७ कोटी २८ लाख रुपयांची मदत झाली आहे. मात्र, या साहाय्यता निधीतून उपचार पूर्ण झालेल्या रुग्णाला, तसेच राज्याबाहेरील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना मदत केली जात नाही.

जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांनी या कक्षाद्वारे मदत मिळविण्यासाठी https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर, कक्षाच्या ई-मेल cmrfpune@gmail.com यावर ऑनलाइन पद्धतीने किंवा प्रत्यक्ष कक्षात येऊन अर्ज सादर करता येतो. ई-मेलद्वारे अर्ज केलेल्यांनी मूळ अर्जासह आवश्यक ती सर्व कागदपत्रे एकत्रितरीत्या aao.cmrf-mh@gov.in या ई-मेलवर पीडीएफ स्वरूपात पाठवावीत. मदतीचे अर्ज नि:शुल्क उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हास्तरीय मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख डॉ. मानसिंग साबळे यांनी दिली.

कोणत्या आजारांना मदत?

मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून ठरावीक आजारांसाठी मदत दिली जाते. त्यात हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, अस्थिमज्जा, हात, खुबा, गुडघा प्रत्यारोपण, अंतस्थ कर्णरोपण (कॉकलीअर इम्प्लाँट), कर्करोग, अस्थिबंधन शस्त्रक्रिया, नवजात शिशू, लहान बालकासंबंधित आजार, रस्ते अपघात, मेंदू आजार, हृदयरोग, डायलिसीस, जळीत रुग्ण आणि विद्युत अपघात, विद्युत जळीत रुग्ण या आजारांसाठी मदत करण्यात येते.