पुणे : आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करुन महात्मा गांधी रस्त्यावरील एका पादत्राणे विक्री दुकानात चोरी करुन पसार झालेल्या मायलेकींना लष्कर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पादत्राणे, तसेच इमेटिशन ज्वेलरी असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी मिनाज मुर्तजा शेख (वय ४०), तसेच तिची मुलगी रिबा मुर्तजा शेख (वय १९, दोघी रा. रा. बुर्ज अल मर्जाना सोसायटी, कोंढवा) यांना अटक करण्यात आली. याबाबत आझम इक्रराब शेख (रा. भवानी पेठ, पुणे) यांनी लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शेख यांचे महात्मा गांधी रस्त्यावर पादत्राणे विक्रीचे दुकान आहे. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी मिनाज आणि तिची मुलगी रिबा या खरेदीसाठी दुकानात आल्या. मिनाजने आयपीएस अधिकारी बतावणी करुन पोलीस दलाचे बनावट ओळखपत्र दाखवले. त्यानंतर विवाह समारंभ असल्याचे सांगून त्यांनी दुकानातून महागडी पादत्राणे खरेदी केली. त्यानंतर ‘पोलीस आयुक्तालायात कामगाराला पाठवा. त्याला पैसे देते’, अशी बतावणी केली. त्यानंतर दोघी पैसे न देता पसार झाल्या.
फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आझम शेख यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर लष्कर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक स्वाती भराडे, हवालदारलोकेश कदम, अमोल कोडीलकर यांनी तपास सुरू केला. पोलिसांनी महात्मा गांधी रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यानंतर पोलिसांनी मिनाझ आणि तिची मुलगी रिबा यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघींकडून पादत्राणे, इमेटिशन ज्वेलरी असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी मिनाज आणि तिची मुलगी रिबा यांच्या विरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. अशा पद्धतीने आणखी काही गुन्हे केले आहेत का? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
सनदी लेखापालाच्या कार्यालयात चोरी करणारे गजाआड
सनदी लेखापालाच्या कार्यालयात चोरी करून पसार झालेल्या चोरट्यांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून साडेआठ हजारांची रोकड आणि चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
निखील विजय पवार (वय १९), अनुराग विजय पवार (वय २१, रा. सरगम चाळ, बिबवेवाडी-गंगाधाम रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी सख्खे भाऊ आहेत. १९ सप्टेंबर रोजी गुलटेकडीतील गिरीधर भवन चाैकातील एका सनदी लेखापालाच्या कार्यालयात मध्यरात्री चोरटे शिरले. चोरट्यांनी कार्यालयाचे दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. कप्प्यातील रोकड, चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल चोरून दोघे जण पसार झाले. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या भागतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले होते. गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस कर्मचारी अमोल रसाळ, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, संजय जाधव यांना सराइत चोरटे पवार यांनी सनदी लेखापालाच्या कार्यालयात चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक रसाळ, आशिष कवठेकर, पोलीस कर्मचारी जाधव, नेवसे, पवार, टकले, चव्हाण, सरडे, आबनावे यांनी ही कामगिरी केली.