पुणे : घरगुती ग्राहकांसाठी वीजदरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यासोबतच ‘टीओडी’ मीटर असलेल्या ग्राहकांनी दिवसा वीज वापरल्यास सवलत देण्याचा प्रस्ताव महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे याचिकेद्वारे दाखल केला आहे. या प्रस्तावानुसार आर्थिक वर्ष २०२५ -२६ मध्ये प्रति युनिट ८० पैशांनी वीज स्वस्त होणार असून आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये ८५ पैसे, २०२७-२८ मध्ये ९० पैसे, २०२८-२९ मध्ये ९५ पैसे तर २०२९-३० मध्ये १ रुपये अशी टप्प्याटप्प्याने कपात करण्याची मागणी महावितरणकडून प्रस्तावित करण्यात आली आहे. महावितरणच्या इतिहासात पहिल्यांदाच वीज दर कपातीचा प्रस्ताव देण्यात आला असून, आयोगाने मान्यता दिल्यास १ एप्रिलपासून नवे वीज दर लागू करण्यात येतील, असे महावितरणमधील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवसातील कोणत्या वेळी किती वीज वापरण्यात आली, त्यानुसार विजेचे दर ठरवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या स्वयंचलित प्रणालीला तांत्रिक भाषेत ‘टीओडी’ म्हणजेच टाईम ऑफ डे असे म्हणतात. ही प्रणाली आतापर्यंत केवळ औद्योगिक ग्राहकांसाठीच वापरण्यात येत होती. मात्र, नव्या नियमांनुसार घरगुती ग्राहकांसाठीही ‘टीओडी’ प्रणाली वापरण्यात येणार आहे आणि केवळ ‘टीओडी मीटर’ असलेल्या घरगुती ग्राहकांनाच सकाळी सहा ते नऊ या वेळेत वीज वापरावर प्रति युनिट ८० पैसे ते १ रुपयापर्यंत सवलत देण्यात येणार आहे.

‘सौरऊर्जेद्वारे निर्माण झालेली वीज स्वस्तात मिळत असल्यामुळे महावितरणला विजेचे दर कमी करणे शक्य होणार आहे. सौरऊर्जा वीज दिवसा मिळते. त्यामुळे दिवसा वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना सवलत देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या सवलीतींचा कोणताही आर्थिक ताण महावितरणवर पडणार नाही. याउलट ‘टीओडी’ सारख्या सुविधांमुळे ग्राहकांसोबतच कंपनीलाही फायदाच होईल,’ असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

महावितरणकडून ‘टीओडी मीटर’ मोफत

घरगुती ग्राहकांना ‘टीओडी’ सवलतींचा लाभ घेता यावा म्हणून महावितरणकडून मोफत टीओडी मीटर बसवून देण्यात येणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान मिळणार असून, नव्या मीटरचा कोणताही आर्थिक भुर्दंड महावितरण व वीजग्राहकांवर स्वतंत्रपणे पडणार नाही. या नवीन मीटरसाठी महावितरणकडून कोणतेही कर्ज काढण्यात आलेले नाही. कोणताही अतिरिक्त वीज दर आकारण्यात येणार नाही. पर्यायाने नव्या मीटरमुळे वीज दरवाढीवर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच ग्राहकांच्या मागणीनंतर हे नवे डिजीटल मीटर ‘प्रीपेड’ करण्याची सक्तीही करण्यात येणार नाही, अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mahavitaran proposal for reduction in electricity tariff for domestic consumers and tod meter holders pune print news tss 19 css