पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणार्‍या २७ वर्षीय तरुणाला जिगेलो (वेश्या व्यवसाय करणारा पुरुष) होण्याचा मोह चांगलाच महागात पडला आहे. आपल्या या विचित्र इच्छेच्या नादामध्ये या तरुणाची तब्बल १७ लाख ३८ हजार ८२२ रूपयांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या या तरुणाला सोशल मीडियावरुन जिगेलो होण्यासंदर्भात माहिती मिळाली होती. कमी वेळात म्हणजे दोन ते तीन तासात अधिक पैसे कमविण्यासाठी जिगेलो होण्यासंदर्भातील ही पोस्ट होती. त्यासाठी त्याला सर्व प्रथम कंपनीचे लायसन्स काढण्यासाठी इंडियन एसकॉर्ट सर्व्हिसेसमध्ये त्याचं नाव रजिस्टर करावे लागेल,असे फसवणूक करणाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यानुसार त्या तरुणाने मागील काही महिन्यामध्ये सर्व प्रक्रिया पार पाडून चार जणांच्या बँक खात्यांवर वेळोवेळी पैसे ट्रान्सफर केले. या तरुणाने एकूण १७ लाख ३८ हजार ८२२ रुपये या चार खात्यांवर जमा केले.

आपण एवढे पैसे भरून देखील आपल्याला कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद समोरील व्यक्तीकडून मिळत नाही, हे लक्षात आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे या तरुणाला समजलं. फसवणूक झालेल्या तरुणाने आमच्याकडे चौघांच्या नावाने तक्रार दिली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याचे दत्तवाडी पोलिसांनी सांगितले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune man fraud for 17 lakh in name of becoming gigolo svk 88 scsg