पुणे : महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (महामेट्रो) आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) प्रवाशांना लवकरच एकाच उपयोजनद्वारे (ॲप) ऑनलाईन ‘तिकीट’ आरक्षित करता येणार आहे.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील सुविधा सुलभ करण्यासाठी दोन्ही विभागांनी एकत्र येऊन एकात्मिक प्रणाली विकसित करण्यासाठी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोबाईलमध्ये वेगवेगळे ॲप ‘डाऊनलोड’ करण्याची गरज भासणार नाही. याबाबत दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांची येत्या आठवड्यात विशेष बैठक होणार आहे. तांत्रिक विभागाच्या मान्यतेनंतर हे ॲप प्रवाशांच्या सेवेसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती ‘महामेट्रो’ आणि ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुलभता निर्माण करून प्रवाशांना सहज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महामेट्रो आणि पीएमपी यांचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो स्थाकांवर पूरक पीएमपी सेवा देण्यात येत असताना आता एकाच ॲपवर तिकीट प्राप्त करण्यासाठी तांत्रिक अडथळे दूर करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तांत्रिक विभागामार्फत ‘ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस’ (एपीआय) कडून ‘पीएमपी’च्या ‘आपली पीएमपीएमएल’ आणि ‘पुणे मेट्रो’ या ॲपवरील वापरकर्त्या प्रवाशांची माहिती संकलित करण्यात येत आहे. तांत्रिक विभागाकडून माहितीचे आदान-प्रदान एकत्रित करून प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष ॲप विकसित करण्यात येत आहे, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी दिली.
‘पीएमपी’ने ‘महामेट्रो’च्या अधिकाऱ्यांबरोबर पुन्हा एकदा बैठक घेऊन ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. येत्या आठवड्यात दोन्ही विभागातील तांत्रिक अभियंत्यांची बैठक होणार असून पुढील पावले उचलले जातील, असे ‘पीएमपी’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले.
प्रवाशांचा वेळ वाचणार
पीएमपी किंवा मेट्रोने प्रवास करताना तिकीट आरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ॲपचा अवलंब करावा लागतो. यामध्ये प्रवाशांचा वेळ वाया जातो. एकाच ॲपद्वारे तिकीट आरक्षित करता आले, तर प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
‘महामेट्रो’ने ‘पुणे मेट्रो’ आणि ‘ओ रिक्षा’ यांच्यासोबत एकात्मिक ॲप विकसित करून सेवा सुरू केली आहे. लवकरच ‘पीएमपी’बरोबरही सुविधा जोडली जाणार आहे. तांत्रिक त्रुटी दूर करून प्रवाशांना एकाच ॲपद्वारे सुलभ सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या महिनाभरात ही सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो, पुणे.