पुणे : ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन’ने (महामेट्रो) दहा कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. आयटी कंपन्या, उद्योगधंदे, शैैक्षणिक संस्था, व्यवसाय, राेजगार यांना चालना मिळत असून, पुण्याच्या गतिमान भविष्याचा मेट्रो अविभाज्य भाग बनत चालली आहे,’ अशी माहिती ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली.
हर्डीकर म्हणाले, ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, विकासकामे, व्यापार, व्यवसाय, नोकरी, शिक्षणामुळे पुण्यात झालेले स्थलांतर आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडणारा ताण, यामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ६ मार्च २०२२ रोजी मेट्रो सेवा सुरू करण्यात आली. त्यानुसार टप्प्याटप्प्याने मेट्रो मार्गांचा विस्तार सुरू आहे.
आतापर्य़ंत पीसीएमसी ते स्वारगेट (पर्पल लाइन) आणि वनाज ते रामवाडी (ब्ल्यू लाइन) या मार्गावर मेट्रो धावत आहे. सुरुवातीला अवघ्या २० हजार प्रवाशांचा प्रतिसाद होता. आता मेट्रोचा विस्तार सुरू असून, प्रवाशांची गर्दी वाढत आहे. गणेशोत्सव, दिवाळी या सणांच्या दिवसांत जादा सेवा आणि प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता वेळेच्या नियोजनानुसार, १५ मिनिटांची वारंवारिता प्रथम १० मिनिटांवर आणि पुन्हा प्रतिसाद वाढल्याने आता सहा मिनिटांवर आणली आहे.’
हर्डीकर म्हणाले, ‘व्यावसायिक केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि आयटी हबपर्यंत पोहोचणे सोयीचे झाले आहे. त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही मेट्रो महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणारी ही वाहतूक व्यवस्था पुणे शहराला अधिक हरित बनविण्यासाठी योगदान देत आहे. चाकण, खराडी, विमानतळ, हडपसर, फुरसुंगी, सिंहगड, खडकवासला, भक्ती-शक्ती (निगडी) असा दोन्ही मार्गांचा विस्तार होणार आहे. या मार्गांवरील विस्तार पूर्ण झाल्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडला शेवटच्या मैलापर्यंत सुलभ दळणवळण सुविधा शक्य होईल.’
मेट्रोच्या विस्ताराचे टप्पे आणि दैनंदिन प्रवासी संख्या
१. ६ मार्च २०२२
पीसीएमसी ते फुगेवाडी ……… २०,०००
वनाज ते गरवारे ३०,०००
२. १ ऑगस्ट २०२३
फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय …….. १,००,०००
गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक……. . १,१०,०००
३. ६ मार्च २०२४
पूर्व-पश्चिम कॉरिडॉर पूर्ण (रामवाडीपर्यंत)…… १,२०,०००-१,३०,०००
४. २९ सप्टेंबर २०२४ भूमिगत मार्गाची पूर्णता (जिल्हा न्यायालय ते स्वारगेट)…… .२,००,००० पर्यंत