पुणे : हिंजवडीच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) केंद्राला शिवाजीनगरशी जोडणाऱ्या ‘पुणे मेट्रो लाईन ३’ म्हणजेच पुणेरी मेट्रो प्रकल्पाला आणखी गती मिळाली आहे. या प्रकल्पामध्ये विद्युत पुरवठ्यासाठी अत्याधुनिक ‘थर्ड रेल सिस्टिम’चा वापर केला जाणार आहे. येत्या गुरूवारपासून (ता.२०) ‘थर्ड रेल’ प्रणालीचे विद्युतीकरण प्रत्यक्ष कार्यान्वित केले जाणार आहे. त्या अंतर्गत हिंजवडी येथे ३३००० व्हॉल्ट, ५० हर्टझ् एसी पॉवर केबल आणि ७५० व्हॉल्ट डिसी थर्ड रेल ट्रॅक्शन प्रणालीची प्रत्यक्ष वीजपुरवठा यंत्रणा कार्यान्वित केली जाईल.

पुणेरी मेट्रो हा हिंजवडीला शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणारा २३ किलोमीटरचा उन्नत मेट्रो रेल्वे प्रकल्प आहे. हा सार्वजनिक खासगी भागीदारी प्रकल्प आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणद्वारे (पीएमआरडीए) टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स यांचा समावेश असलेल्या गटाला प्रदान करण्यात आला आहे. हा प्रकल्प पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनी द्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित करुन चालविला जाणार आहे.

हेही वाचा…महायुती : रामदास आठवलेंचा विधानसभेच्या आठ ते दहा जागांवर दावा; म्हणाले…

नागरिकांच्या सोयीसाठी हाती घेण्यात आलेल्या पुणेरी मेट्रो प्रकल्पाच्या सर्व टप्प्यांमध्ये सुरक्षिततेशी कुठलीही तडजोड न करण्याचे टाटा समूहाचे धोरण आहे. पुणेरी मेट्रोचे कामकाज सुरक्षित आणि कार्यक्षमतेने चालावे यासाठी सर्व नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. यामुळे प्रकल्प विकासकांनी सर्व व्यक्तींना सुरक्षिततेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आणि विद्युतीकरण झालेल्या भागात अनधिकृत प्रवेश टाळण्याचे आवाहन केले आहे. सर्व प्रकारची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी या भागात अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही कारणास्तव विद्युत क्षेत्राजवळ जाण्यास किंवा कसलेही काम करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. त्यानुसार या परिसरातील सर्व नागरिकांनी तसेच कर्मचाऱ्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पुणेरी मेट्रोच्या विकासकांनी केले आहे.

हेही वाचा…कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा सखोल तपासणी अहवाल पोलिसांकडून बाल न्याय मंडळाकडे सादर; काय आहे अहवालात?

थर्ड रेल विद्युतीकरण विभाग तपशील

मार्गिका : पुणे मेट्रो लाईन ३
विद्युतीकरणाची तारीख: २० जून