पुणे महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेला महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना अमृत महोत्सवाची आठवण झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे महापालिकेचे अमृत महोत्सवी वर्ष १५ फेब्रुवारी २०२४ ला सुरू झाले. वर्षभर अमृत महोत्सवी वर्षाचा विसर पडलेल्या महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना आता याची आठवण झाली असून, ७५ वर्षे साजरे करण्यासाठी दोन आठवड्यांपूर्वी विविध समित्या स्थापन करण्याचा ‘पराक्रम’ महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, आयोजनासाठी कमी कालावधी असल्याने या समित्यांचे कामकाज कागदावरच राहिले आहे.

पुणे महापालिका यंदा १५ फेब्रुवारीला ७५ वर्षे पूर्ण करून ७६ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या वर्षी १५ फेब्रुवारी २०२४ मध्ये महापालिकेने अमृतमहोत्सवी वर्षात प्रवेश केला. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेत गेल्या तीन वर्षांपासून लोकप्रतिनिधी नाहीत. संपूर्ण कारभार प्रशासकाच्या हाती आहे. महापालिकेच्या अमृतमहोत्सवी वर्षाची आठवण महापालिका प्रशासनाला राहिली नसल्याचे समोर आले आहे. या वर्षाची सांगता येत्या १५ फेब्रुवारीला चहापाण्याचा कार्यक्रम घेऊन करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

महापालिकेच्या हिरवळीवर हा कार्यक्रम होईल.दहा हजार कोटींचे अंदाजपत्रक पुणे महापालिकेचे असून मुंबई महानगरपालिके पेक्षा मोठे क्षेत्रफळ असलेली महापालिका अशी ओळख पुणे महापालिकेची आहे.

अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पुणे शहराचे ब्रॅंडिंग करण्याची व लोकसहभागाने अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याची संधी महापालिका प्रशासनाला होती. मात्र वर्षभरात एकही कार्यक्रम प्रशासनाने घेतला नाही. तीन आठवड्यापूर्वी आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी एक बैठक घेऊन अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अनेक समित्यांची स्थापन केली. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना या समित्यांचे अध्यक्ष करण्यात आले. अन्य विभागाप्रमुख हे समित्यांचे सदस्य होते. पण या समित्यांचे कामकाजही पूर्णपणे झाले नाही.

केवळ छत्रपती संभाजी उद्यानात फळे-फुले भाजीपाला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे आणि शनिवारी महापालिका भवनाच्या हिरवळीवर चहापानाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी लोकप्रतिनिधी, निवृत्त अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, राजकीय कार्यकर्ते यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

माजी महापौर संघटनेकडून नाराजी

महापालिकेत नगरसेवक नसल्याने प्रशासकच तीन वर्षांपासून कारभार पाहत आहेत. महापालिकेत महापौर, नगरसेवक असते, तर त्यांनी अमृतमहोत्सवी वर्ष उत्साहात साजरे केले असते. प्रशासनाने ही संधी वाया घालविल्याबद्दल माजी महापौर संघटनेने नाराजी व्यक्त केली. पालिकेने संघटनेशी संवाद साधला असता तर त्यांना आवश्यक सहकार्य केले असते, अशी भूमिका माजी महापौर संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे, निमंत्रक अंकुश काकडे यांनी मांडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal administration forming various committees to celebrate 75 years pune print news ccm 82 zws