पुणे : जिल्ह्यातील १४ नगर परिषदांसाठी २८२ आणि तीन नगर पंचायतीसाठी १३६ हरकती प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी बुधवार आणि गुरुवार (३ आणि ४ सप्टेंबर) त्यावर सुनावणी घेणार आहेत. सुनावणीची ही प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत होणार आहे.

दरम्यान, फुरसुंगी आणि उरूळी देवाचीमध्ये सोळा प्रभाग करण्यात आले आहे. मात्र, येथील प्रभागांची संख्या वाढवावी, अशी हरकतही नोंदविण्यात आली आहे.

‘फुरसुंगी-उरूळी देवाची, बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव, शिरूर, जुन्नर, माळेगाव बुद्रुक या नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी बुधवारी सुनावणी होणार आहे. तर, चाकण, सासवड, आळंदी, भोर आणि राजगुरूनगर या नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या सुनावणी प्रक्रिया गुरुवारी होणार आहे,’ असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील नगर पंचायतीपाठोपाठ १४ नगरपरिषदांच्या प्रारुप प्रभागरचनेबाबत मोठ्या प्रमाणावर हरकती प्राप्त झाल्या आहेत. नव्याने स्थापन झालेल्या फुरसुंगी उरूळीदेवाची या नगर परिषदेसाठी सर्वाधिक ६६ इतक्या हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्या पाठोपाठ राजगुरूनगरमधून ५१, भोरमधून ४६, लोणावळ्यातून ३०, सासवडमधून ३३, आळंदीमधून २३ इतक्या हरकती आल्या आहेत. जेजुरी आणि इंदापूरमधून एकही हरकत नोंदविली गेली नाही. बारामतीमधून दोन, तळेगाव, जुन्नरमधून प्रत्येकी एक हरकत आहे. जिल्ह्यातील १४ नगर परिषदांमधून २८२ इतक्या हरकती आल्या आहेत.

सर्वाधिक हरकती या फुरसुंगी उरूळी देवाची या नगरपरिषदेच्या प्रभागाबाबत झाल्या आहेत. त्यात पूर्वीचे जुने गाव हे फुरसुंगी असून त्यातील प्रभाग संख्या कमी आहे. भेकराईनगर- फुरसुंगीची पूर्वी ३० ते ३३ हजार इतकी लोकसंख्या होती. आता फुरसुंगी परिसराचा विस्तार होऊन भेकराईनगर, तुकाई दर्शन, पापडे वस्ती, गंगानगर, ढमाळवस्ती, पॉवर हाऊस, हुंडेकरी वस्ती, खुटवड चौक आदी भागांचा विस्तार झाला आहे. या ठिकाणी प्रभागसंख्या अधिक आहे. जुन्या फुरसुंगी भागात प्रभागाची संख्या वाढविण्याची मागणी या नगर परिषद हद्दीतील इच्छुकांनी केली आहे.

फुरसुंगी ऊरूळी देवाची नगर परिषदेची लोकसंख्या ७५ हजार इतकी आहे. या लोकसंख्येनुसार, ४ हजार १४५ ते ५ हजार १८९ या लोकसंख्येदरम्यान प्रभागनिर्मिती केली आहे. सरासरी ४ हजार ७१७ इतकी एका प्रभागाची लोकसंख्या आहे. फुरसुंगी उरूळी देवाचीमधील सहा क्रमांकाचा प्रभाग हा सर्वाधिक लोकसंख्येचा झाला आहे, अशीही तक्रार करण्यात आली आहे.