पुणे : महापालिकेच्या शेकडो कर्मचाऱ्यांना प्राप्तिकर विभागकडून दंड ठोठावण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांकडे असलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेच्या लेखा विभागाने कर्मचाऱ्यांचे वेतनच थांबवले आहे. या विरोधात पुणे महापालिका कर्मचारी संघनटेने आंदोलन केले. त्याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवू नये, असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे महापालिकेच्या प्रशासनाच्या चुकीमुळे महापालिकेत काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस आल्या आहेत. महापालिकेच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे हजारो कर्मचाऱ्यांना सुमारे ४० ते ५० कोटी रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. कर्मचाऱ्यांना ‘फॉर्म १६’ देणे व त्यांच्या वेतनातून किती रुपये कर कपात केली गेली, याचा गोषवारा देणे ही जबाबदारी मुख्य लेखा व वित्त विभागाची आणि महापालिकेने नियुक्त केलेल्या कर सल्लागारांची आहे.

केंद्र सरकारच्या प्राप्तिकर विभागाने कर्मचाऱ्यांना आकारलेला दंड हा पॅन क्रमांकावर आकारलेला आहे. असे असताना मागील दोन महिन्यांपासून प्रशासनाने मात्र संबधित हजारो कर्मचाऱ्यांचे वेतन रोखून धरले आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे आकारलेल्या या दंडाची जबाबदारी प्रशासनाचीच आहे. ती प्रशासनाने पार पाडावी. कर्मचाऱ्यांना तातडीने वेतन द्यावे अन्यथा या विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महापालिका कर्मचारी संघटनेने अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांना दिला.

त्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवू नये, असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले. संघटनेचे अध्यक्ष बजरंग पोखरकर, उपाध्यक्ष विशाल ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune municipal employees salaries were delayed due to an error in the accounting department pune print news ccm 82 amy