पुणे : पुणे महापालिकेच्या अखत्यारितील ३१३ शाळांमध्ये शिक्षकांची ३२० पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. मात्र, रिक्त जागांवर करार पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्टीकरण महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिले आहे.

आम आदमी पक्षाचे शहर उपाध्यक्ष ॲड. कृणाल घारे यांनी महापालिकेच्या शाळांतील एकूण शिक्षक, कार्यरत शिक्षक, रिक्त पदांबाबतचा तपशील माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितला होता. त्याला महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी स्नेहल उकरंडे यांनी उत्तर दिले आहे. त्यानुसार महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या २३४, इंग्रजी माध्यमाच्या ४६, ऊर्दू माध्यमाच्या ३१, कन्नड माध्यमाच्या दोन अशा एकूण ३१३ शाळा आहेत.

या शाळांमध्ये मुख्याध्यापकांची २३३, उपशिक्षकांची १ हजार ७९०, पदवीधर शिक्षकांची ८१९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी मुख्याध्यापकांची ५७, उपशिक्षकांची २४, तर पदवीधर शिक्षकांची २३९ पदे रिक्त असून, १७६ मुख्याध्यापक, १ हजार ७८२ उपशिक्षक, ५८० पदवीधर शिक्षक कार्यरत आहेत. तर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये १४ उपशिक्षक, कन्नड माध्यमाच्या शाळांमध्ये २ उपशिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

या अनुषंगाने माहिती अधिकार अर्जदार ॲड. कृणाल घारे, आप शिक्षक आघाडीच्या शीतल कांडेलकर म्हणाले, सरकारकडून शिक्षण सुधारणा, डिजिटल शाळा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे दावे केले जात असले, तरी स्थानिक पातळीवरील वास्तव अगदी उलट असल्याचे दिसून येते. महापालिकेच्या ३१३ शाळांमध्ये एकूण २ हजार ८४२ मंजूर पदे असताना केवळ २ हजार ५३८ शिक्षक कार्यरत असून ३२० पदे रिक्त आहेत. म्हणजेच हजारो मुलांना शिकवायला शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नाहीत. या प्रशासकीय बेपर्वाईचा समाजावर गंभीर परिणाम होत आहे. रिकाम्या वर्गांमुळे केवळ अभ्यास नाही, तर समाजाचे भविष्य थांबते.

पुण्यात अल्पवयीन मुलांमध्ये वाढत असलेला गुन्हेगारीचा प्रश्न हा ढासळत्या शिक्षण व्यवस्थेशी संबंधित आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क असूनही प्रशासनाकडून त्याकडे केले जात असलेले दुर्लक्ष घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन आहे. त्यामुळे महापालिकेने आता तातडीने पूर्णवेळ शिक्षकांची नियुक्ती केली पाहिजे. या संदर्भात आता आम आदमी पक्षातर्फे उच्च न्यायालयात रिट याचिकाही दाखल केली जाणार आहे.

रिक्त जागांवर करार पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नियमित भरतीसाठी बिंदुनामावलीची प्रक्रियाही सुरू आहे. – सुनंदा वाखारे, प्रशासकीय अधिकारी, शिक्षण विभाग, पुणे महापालिका