पुणे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने शहरातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने योग प्रात्यक्षिकांद्वारे शरीर आणि मनाच्या आरोग्याचा संदेश देण्यात आला. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील विविध ठिकाणी भक्तियोग उपक्रम राबविण्यात आला.कबीर मठ संस्था आणि बुलढाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल येथे योग दिन साजरा करण्यात आला. खासदार मेधा कुलकर्णी, माधव माटे, प्रीतम जोशी या वेळी उपस्थित होते.
साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि वीर शिवराज मंडळाच्या वतीने नूतन मराठी विद्यालयात योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात भाग घेतला. योग गुरू विठ्ठल कडू यांच्यासह त्यांची मुले नारायणी आणि सिद्धेश कडू यांनी विविध आसने सादर केली. आमदार हेमंत रासने, पराग ठाकूर, ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा, मंडळाचे अध्यक्ष किरण सोनीवाल, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, संगीता काळे, लालबहादूर जगताप या वेळी उपस्थित होते.
कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. सायरस पूनावाला हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची योगासने सादर करून योग दिन साजरा केला. संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजिण्यात आला. शाळेच्या माजी शिक्षिका शैलजा साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य प्रशांत वाघ, दत्तात्रय मोरे, चेतन महाजन, राजेश भुसारी या वेळी उपस्थित होते. मृणाल गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत पालक, विद्यार्थी आणि वारकरी यांनी संगीत योग उपक्रम साजरा केला. नवी पेठेतील विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष शंकरराव निवंगुणे, मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, प्रशांत सुर्वे, बाळासाहेब काळभोर, समीर पवार या वेळी उपस्थित होते. शिक्षिका प्रियांका शेंडकर, अमृता महाबळेश्वरकर आणि रती काळभोर यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली.शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी ‘योग दिन’ साजरा केला. राज्य योगशिक्षक संघाच्या चंद्रज्योती दळवी, आरुषी शिंगोटे आणि गौरी पाटील यांनी योगासनांचे संचालन केले.