पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच कोणत्याही कार्यक्रमाना वेळेपूर्वी जातात. त्यामुळे अजित पवार येणार म्हटल्यावर आयोजकांना कार्यक्रमाच्या नियोजित वेळेच्या अगोदर किमान तासभर तरी सर्व तयारी करून ठेवतात. हे सर्व राज्यातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माहिती आहे. अजित पवार यांच्या ही कामाची पद्धत सर्व पक्षीय नेत्यांना आवडते.

पण आज असाच एक कार्यक्रम पुण्यातील विधानभवन येथील विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्याचे ठरविले होते. त्यानुसार प्रशासनाच्या माध्यमांतून सर्व तयारी करण्यात आली होती. पण अजित पवार हे कार्यक्रमाच्या ठिकाणी सहा वाजण्याच्या सुमारास हजर झाले आणि काही वेळ अधिकारी वर्गासोबत चर्चा केल्यानंतर सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांनी कार्यालयाच उदघाटन केले. तर त्यानंतर भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या कार्यक्रमाच्या अगोदर दहा मिनिट शिल्लक असताना पोहोचल्या, त्यावेळी अजित पवार यांचा काही अधिकारी, पदाधिकारी सत्कार करताना मेधा कुलकर्णी यांना दिसले.

ते पाहून मेधा कुलकर्णी यांचा चांगलाच पारा वर चढला आणि अजित पवार यांच्या समोर नाराजी व्यक्त केली. दादा साडे सहा वाजता उद्घाटन होणार होतं, त्या अगोदरच तुम्ही उद्घाटन केले. त्यावर अजित पवार म्हणाले, तुम्ही येणार होतात, याबाबत मला काही माहीती नव्हते. त्यावर मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, कधी नव्हे ते परशुराम आर्थिक विकास महामंडळ झाले आहे आणि मी येणार नाही असे होणार नाही, असे म्हणत मेधा कुलकर्णी यांचा तक्रारीचा सुरू वाढल्याचे लक्षात येताच, अजित पवार म्हणाले, ताई चला आपण पुन्हा उद्घाटन करुयात, त्यानंतर पुन्हा एकदा कोनशिलाचे अनावरण करण्यात आले आणि या वादावर पडदा पडल्याचे चित्र तात्पुरते तरी पडले. पण या दोनदा झालेल्या उद्घाटनाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.

त्या प्रकरणावर भाजपच्या नेत्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, मी विषय वाढवणार नव्हते.पण तुम्ही आला म्हणून सांगते. अजितदादा हे वेळेपूर्वी जवळपास २० मिनिट अगोदर आले आणि उद्घाटनच्या अगोदर दहा मिनिट अगोदर अजितदादांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच उद्घाटन केले. आम्ही कार्यक्रमाच्या दहा मिनिट अगोदर पोहोचलो. तर तोवर उद्घाटन झाले होते. याबद्दल मला नक्कीच मला वाईट वाटलं . त्याबाबत मी माझी खंत दादांना बोलवून दाखवली.

तसेच यापुर्वी देखील दादांनी शिवाजीनगर येथील कार्यक्रम वेळेपूर्वी उद्घाटन करून टाकले होते. त्यामुळे माझी दादांना एक विनंती राहील की, दादांना तुम्ही रात्रीची, पहाटेची वेळ घोषित करा, आम्ही नक्कीच वेळेत येऊ, जर आम्हाला उशीर झाला. तर अजिबात थांबू नका, आम्ही निश्चित वेळेआधी दहा मिनिट येऊ, जर बस किंवा फ्लाईट आपण ज्यासाठी पकडण्यासाठी जातो तेच आधी निघून गेलं तर वाईट वाटणारच ना, जी वेळ घोषित केली आहे. त्याआधी उद्घाटन करू नये, अशी मागणी अजित पवार यांच्याकडे त्यांनी केली.