पुणे : पुण्यातील सुमारे शंभरहून अधिक खासगी रुग्णालये विनापरवाना सुरू असल्याची बाब समोर आली होती. या रुग्णालयांच्या परवान्याची मुदत ३१ मार्चअखेर संपूनही त्यांनी नूतनीकरण न केल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत बहुतांश रुग्णालयांच्या परवान्याच्या नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

महापालिकेच्या हद्दीत ८४० खासगी रुग्णालये आहेत. त्यातील ४१० रुग्णालयांच्या परवान्याचे नूतनीकरण मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. कारण त्यांच्या परवान्याची मुदत ३१ मार्चला संपुष्टात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने २२ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत यासाठी एक खिडकी योजनेसह विशेष मोहीम राबविली. शहरात ५ मार्चला नूतनीकरण झालेल्या रुग्णालयांची संख्या ३१० आणि नूतनीकरण न झालेल्या रुग्णालयांची संख्या १०० होती. मागील पाच दिवसांत आरोग्य विभागाने शिल्लक राहिलेल्या बहुतांश रुग्णालयांचे परवाना नूतनीकरण पूर्ण केले आहे.

हेही वाचा : एसबीआयची अजब भूमिका! आधी रोखे गोपनीय अन् आता खर्चही गोपनीय

महापालिकेकडून परवान्याचे नूतनीकरण न करणाऱ्या रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई केली जाते. महापालिकेला ही रुग्णालये बंद करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे वैध परवाना नसताना सेवा देणाऱ्या या रुग्णालयांना दरमहा केवळ १०० रुपये दंड केला जातो. या दंडाची सर्वाधिक रक्कम पाच हजार रुपये आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाईला ही रुग्णालये जुमानत नव्हती. आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत बहुतांश रुग्णालयांचे नूतनीकरण पूर्ण केले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरणात दोषी कोण? अखेर सत्य येणार बाहेर

शहरातील खासगी रुग्णालये एकूण रुग्णालये – ८४०

यंदा परवान्याची मुदत संपणारी रुग्णालये – ४१०

परवाना नूतनीकरण केलेली रुग्णालये – ३५०

परवाना नूतनीकरण न झालेली रुग्णालये – २८
रुग्णालय बंद करण्याचे प्रस्ताव – ३०

हेही वाचा : राज्यात सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यात 

रुग्णालयांच्या परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परवाना नूतनीकरण राहिलेल्या सर्व रुग्णालयांनाही याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यामुळे सर्व रुग्णालयांच्या परवान्याचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे.

डॉ. भगवान पवार, आरोग्यप्रमुख, महापालिका