Pune Police Commissioners order to take strict action against those who demand extortion in the name of Mathadi organization | Loksatta

पुणे : माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यांवर कडक कारवाई करणार; पोलीस आयुक्तांचे आदेश

पुणे शहरातील माथाडी संघटनेच्या नावाखाली धमकावून खंडणी उकळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पुणे : माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्यांवर कडक कारवाई करणार; पोलीस आयुक्तांचे आदेश

माथाडी संघटनेच्या नावाखाली शहरातील ओैद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे मालक, उद्योजक आणि व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले. खंडणीसाठी धमकी आल्यास उद्योजक, व्यापाऱ्यांनी त्वरीत नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी बैठकीत केले.

हेही वाचा- पुणे : दौंडमधील सामूहिक हत्याकांड प्रकरणातील तीन मृतांचे पुन्हा शवविच्छेदन

शहरातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे मालक, उद्योजक, व्यापाऱ्यांना माथाडी संघटनेच्या नावाखाली धमकावून खंडणी उकळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मराठा चेंबर ऑफ काॅमर्स, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. बैठकीत विविध संघटनांचे १०० प्रतिनिधी सहभागी झाले होते. सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, विशेष शाखेचे उपायुक्त आर. राजा, अमोल झेंडे, विजयकुमार मगर, स्मार्तना पाटील, विक्रांत देशमुख, शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त राजेंद्र साळुंके, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर तसेच माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे निरीक्षक राजेश मते आदी या वेळी उपस्थित हाेते.

हेही वाचा- पुणे ग्रामीण भागातील सीएनजी पंप बेमुदत बंद; वाहनधारकांना मनस्ताप

शहरातील औद्योगिक वसाहतीत माथाडी संघटना तसेच विविध संघटनांच्या नावाखाली व्यावसायिक, उद्योजकांना धमकावून खंडणी उकळण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. खंडणीस नकार दिल्यानंतर मालाची ने-आण करणाऱ्या कामगारांना धमकावून वेठीस धरले जाते. माथाडी संघटनेच्या नावाखाली पैसे उकळले जातात तसेच अडवणूक केली जाते, अशा तक्रारी या बैठकीत उद्योजक, व्यावसायिकांकडून करण्यात आल्या.

हेही वाचा- महाबँकेचे कर्मचारी संपावर, दोन हजारपेक्षा जास्त शाखा बंद; रोखीचे, धनादेश वटवण्याचे व्यवहार थांबले

वर्गणीच्या नावावर खंडणी उकळली जाते. माथाडी कामगारांच्या मजुरीचे दर ठरवून देण्याची आवश्यकता आहे. वाहतूक विषयक समस्या सोडविण्याची गरज असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, ‘माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागितल्यास न घाबरता नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी. पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी तक्रारींची गंभीर दखल घेऊन त्वरीत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.’ माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाचे निरीक्षक राजेश मते यांनी माथाडी कामगार कायद्यातील तरतुदींबाबत माहिती दिली. माथाडी मंडळाकडे तक्रारी दाखल करण्याचे प्रमाण कमी असून काही तक्रारी असल्यास त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन मते यांनी केले.

हेही वाचा-

गेल्या आठवड्यात पुणे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत चाकण ओैद्योगिक वसाहतीत बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या, कायदा आणि सुव्यवस्था, महिला कामगार तसेच वाहतूक समस्येबाबत आढावा घेण्यात आला होता.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 16:29 IST
Next Story
पुणे : मित्राच्या पत्नीला धमकावून बलात्कार; चंदननगर पोलिसांकडून एकाला अटक