पुणे : नाना पेठेतील डोके तालमीजवळ बेकायदा फलक (फ्लेक्स) लावल्या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पुणे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, कृष्णा बंडू आंदेकर, माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर, शिवम उदयकांत आंदेकर, अभिषेक उदयकांत आंदेकर, शिवराज उदयकांत आंदेकर, सोनाली वनराज आंदेकर, प्रियंका कृष्णा आंदेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना पेठेतील इनामदार काॅम्प्लेक्स इमारतीच्या परिसरात आंदेकर टोळीने बेकायदा फलक लावले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग, तसेच शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी आंदेकर टाेळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
महापालिकेतील अधिकाऱ्यांनी बेकायदा फ्लेक्स प्रकरणात आणखी एक फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकरसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना पेठेतील एका मंडळाच्या पदाधिकाऱ्याने बेकायदा फ्लेक्स लावल्या प्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार सचिन गायकवाड तपास करत आहेत. आंदेकर टोळीने केलेल्या बेकायदा बांधकामांवर पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली. या कारवाईत पत्र्याचे शेड, तात्पुरते केलेले बांधकाम, तसेच गणेश पेठेतील नागझरीत बेकायदा सुरू केलेल्या मासळी बाजारात ही कारवाई करण्यात आली.
नाना पेठेतील टोळीयुद्ध, तसेच माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी घडली होती. आयुष हा बंडू आंदेकरचा नातू आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात गणेश कोमकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर बंडू आंदेकरने आयुषच्या खुनाचा कट रचला होता. अमन पठाण आणि यश पाटील यांनी त्याच्यावर गोळीबार केला होता.
या प्रकरणात सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (वय २७), स्वराज नीलंजय वाडेकर (वय २३), अमन युसूफ पठाण (वय २५), सुजल राहुल मेरगु (वय २०), यश सिद्धेश्वर पाटील (वय १९), अमित प्रकाश पाटोळे (वय १९), शिवम ऊर्फ शुभम उदयकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), कृष्णा ऊर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ३६), मुनाफ रिजाय पठाण (वय २८) लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), वृंदावनी नीलंजय वाडेकर (वय ४०), सोनाली वनराज आंदेकर (वय ३७, सर्व रा. नाना पेठ) यांना् अटक करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालायने आरोपींना येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.