पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या कठोर नियमांवर ढोल-ताशा महासंघाने आक्षेप घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाने निर्णयात बदल केला आहे. सुरुवातीला एका पथकात फक्त ६० वादक आणि सहायकांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता ती संख्या दुप्पट करण्यात आली आहे. ठरवलेल्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन झाले, तर पथकांची संख्या किंवा सदस्य संख्येवर कोणताही अडसर आणला जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वी ३ सप्टेंबर रोजी जाहीर नियमावलीनुसार एका मंडळाला दोनच पथके लावण्याची मुभा होती आणि ढोल-ताशा पथक किंवा ध्वनीक्षेपक यांपैकी केवळ एकाच पर्यायाला परवानगी होती. यावर महासंघाने परंपरेला बाधा होत असल्याचे सांगत आक्षेप नोंदवला होता. गेली अनेक वर्षे १५० ते २०० सदस्य पथकांमध्ये सहभागी होत आहेत. केवळ ६० जणांमध्ये पारंपरिक सादरीकरण अशक्य आहे, अशी भूमिका महासंघाने घेतली होती. यानंतर पोलिस प्रशासनाने १२० सदस्यांची परवानगी दिली. मात्र, स्थिर वादनास बंदी, मिरवणुकीदरम्यान उलटे चालण्यास मनाई आणि विसर्जन जलद व शिस्तीत पार पाडण्यासाठी आखलेले इतर सर्व निर्बंध यथावत राहणार आहेत.
“ढोल-ताशा पथकातील वादकांसह बदली वादक आणि सहायक असे मिळून एका पथकात १२० जणांच्या संख्येला परवानगी देण्यात आली आहे. मिरवणुकीत मंडळांनी वेळापत्रकाचे पालन करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर