पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीने सात ते आठ पालकांची फसवणूक केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे.

याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पुणे स्टेशन परिसरातील एका सोसायटीत राहायला आहे. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादर महिला चिंचवडमधील केशवनगर भागात राहायला आहे. आरोपीने तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर मे महिन्यात संपर्क साधला होता. ‘तुमच्या मुलाला नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देतो’, असे आमिष चोरट्याने महिलेला दाखविले होते. त्यानंतर चोरट्याने महिलेला पुणे स्टेशन परिसरातील परमार बिल्डींग परिसरात भेटायला बोलाविले होते. अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने महिलेकडून पैसे घेतले.

महिलेच्या मुलाला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्याने तिने विचारणा केली. तेव्हा आरोपीने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपीने अशा पद्धतीने सात ते आठ पालकांची फसवणूक केली आहे. याबाबत त्यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहेत. आरोपीने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशाच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक केली आहे. त्याने अशा पद्धतीने आणखी काही पालकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने बंडगार्डन पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.

शहरातील अनेक नामवंत अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने पालकांची फसवणूक करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. अनेक विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी बारावीनंतर परीक्षा देतात. विद्यार्थी त्यादृष्टीने तयारी करणाऱ्या शिकवणी वर्गात प्रवेश घेतात. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल, तसेच त्यांची माहिती मिळवून आरोपी पालकांशी संपर्क साधतात. कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून चोरटे त्यांची फसवणूक करतात. पुणे शहरात परराज्य, तसेच परगावाहून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. परराज्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांना आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखविणाऱ्या चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.