पुणे : सातारा रस्त्यावरील एका मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या देहविक्रय व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी मसाज पार्लरचालक महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहायक पोलीस फौजदार बापू खुटवड यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा रस्त्यावरील धनकवडी भागात एका इमारतीत हॅप्पी स्पा मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. याबाबतची माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावला.

बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लरचालक महिलांना ताब्यात घेतले, तसेच मसाज पार्लरमधील तरुणींना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपी महिलांनी त्यांना जादा पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दोघींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण तपास करत आहेत.

शहरात मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रय व्यवसायाचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाईचे आदेश दिले. दोन दिवसांपूर्वी मार्केट यार्ड भागातील एका मसाज पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी महिलेला अटक केली होती. या कारवाईत पोलिसांनी मसाज पार्लरमधील तरुणींची सुटका केली होती.