परतीच्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून पुणे शहर आणि परिसरामध्ये हाहाकार माजला आहे. शहरात सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी रात्रीपासून वाढला असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामध्ये आत्तापर्यंत वेगवेगळ्या दूर्घटनांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या तुकड्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या काम करत आहे. बुधवार रात्रीपासून पुण्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान आज सकाळीच मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे युतीच्या जागावाटपाच्या बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले. यावरुनच काँग्रेसने सरकारवर टीका केली असून सरकारला पूरपरिस्थितीचे गांभीर्य नसल्याचा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला आहे.

‘फडणवीस सरकारला लोकांच्या प्रश्नांशी काहीच देणंघेणं नाहीय. पुण्यामध्ये पूरात माणंस मरत असताना भाजपाचे मंत्री मात्र निवडणुकीसंदर्भातील कामांमध्ये अडकेलेले आहेत. कोल्हापूर-सांगलीत पूर आला तेव्हा मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा काढण्यात व्यस्त होते आणि आज पुण्यामध्ये पूर आलेला असताना पुण्याचे पालकमंत्री चंद्राकांत पाटील हे युतीच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत,’ अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. ‘या सरकारचा सर्व कारभार रामभरोसे सुरु आहे,’ असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

पुणेकरांची मदत करण्यासाठी सरकारी अधिकारी कुठेच दिसत नसल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. ‘शहरावर संकट ओढवलं असताना पूर परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी आणि अधिकारी घटनास्थळी उपस्थित असणं गरजेचे आहे. मात्र सरकारला निवडणूक अधिक महत्वाची असल्याने जनतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे. सरकारला सामान्यांशी काहीही देणं घेणं नाहीय,’ असं वडेट्टीवार म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी पुण्यात झालेल्या जिवितहानीबद्दल ट्विटरवरुन दु:ख व्यक्त केलं आहे. राज्य सरकार पुणे महानगरपालिकेच्या सतत संपर्कात असून बचाव कार्य सुरु असल्याचे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्री फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि राज्यातील भाजपाचे प्रमुख मंत्री युतीसंदर्भातील जागावाटपाच्या चर्चेसाठी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्लीमध्ये गेले आहेत. आजच्या चर्चेनंतर शिवसेना-भाजपा युतीमध्ये जागावाटप कसे केले जाईल यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.