Accused Dattatraya Gade Police Custody: पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर घडलेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडेला रात्री गुणाट या गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्याला पुण्यातील सत्र न्यायालयात हजर केले असता १२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावतीने साजिद शाह आणि वाजिद खान बिडकर या वकिलांनी त्याची बाजू मांडली. सुनावणीनंतर माध्यमांशी बोलत असताना वकिलांनी दत्तात्रय गाडे निर्दोष असल्याचे म्हटले.
वकील वाजीद खान म्हणाले, “दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार नाही. त्याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल असून ते सिद्ध झालेले नाहीत. बलात्काराची घटना पहाटे ५.४५ वाजता घडल्याचे म्हटले जाते. ती ओरडू शकली असती, ती प्रतिकार करू शकली असती. पण यात बळजबरीने काही झाले, असे दिसून येत नाही. न्यायालयाने सुनावणी घेतल्यानंतर १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आम्ही १२ मार्च रोजी आरोपीची बाजू मांडू. तसेच आरोपी दत्ता गाडेच्या भावालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. तो हुबेहूब आरोपी गाडेसारखाच दिसतो.”
तसेच आरोपीचे दुसरे वकील म्हणाले, “आम्ही आरोपीशी चर्चा केली. त्याला आम्ही सत्य घटना काय आहे? अशी विचारणा केली असता, तो म्हणाला की, बसमध्ये आधी पीडित तरुणी चढली होती. नंतर मी गेलो. आमच्यात जे झाले, ते दोघांच्या संमतीने झाले.” जर संमतीने ती घटना घडली होती तर आरोपीने पळ का काढला? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला असता वकील म्हणाले की, त्याबाबत आम्हाला अद्याप माहिती नाही.
“पोलिसांना त्याचा मोबाइल जप्त करायचा आहे. तसेच वैद्यकीय तपासणी करायची आहे. त्यामुळे १५ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. पण न्यायालयाने १२ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानुसार संमतीने संबंध झाले असतील तर ते बलात्काराच्या व्याख्येत येत नाही”, असेही आरोपीचे वकील म्हणाले.
म्हणून आरोपी पळून गेला
वकील वाजीद खान पुढे म्हणाले, “आरोपी दोन दिवस लपून राहिला कारण त्याला जीवाची भीती वाटत होती. हे प्रकरण माध्यमात मोठ्या प्रमाणात चालवले गेले. त्याचा फोटो माध्यमांत दाखवला गेला, त्यामुळे त्याच्या कुटुंबा समोर अडचणी उभ्या राहिल्या असून त्यांच्यासमोर उपासमारीचा प्रश्न आहे. त्यामुळे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी काहीतरी करायला हवे.”
© IE Online Media Services (P) Ltd