Pune Shivshahi Bus Rape Case Update : पुणे येथील स्वारगेट बस स्थानकातील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या अखेर मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून त्याची माहिती आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे पोलीस आयुक्त म्हणाले, “प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे वळ आहेत, या वळानुसार त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असं आरोपीने सांगितलं आहे. परंतु, दोरी तुटल्यामुळे आणि इतर लोक आल्यामुळे त्याचा जीव वाचला.”

“त्याने खरंच आत्महत्येचा प्रयत्न केला होता का याची चौकशी करण्याकरता पथक तिथे पाठवण्यात येणार आहे. परंतु प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार त्याच्या गळ्यावर दोरीचे वळ होते”, असं आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

स्थानिकांचा सत्कार करणार

“एसटी स्थानकातील २३ सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्थानकाबाहेरील ४८ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दीड ते दोन तासांत आम्ही आरोपीची ओळख पटवली होती. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही आरोपीच्या गावात जावून शोधमोहिम घेत होतो. पण आरोपी तेव्हा सापडला नाही. अखेर तो आज सापडला आहे. याकरता मी गावातील नागरिकांचे धन्यवाद देतो. त्या गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. तिथे ज्या-ज्या लोकांनी मदत केली, त्यांचं विशेष अभिनंदन करणार आहोत”, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

एक लाखांचं बक्षिस मिळणार

“शेवटच्या माहितीवरून आम्ही आरोपीला पकडलं. शेवटची माहिती आली की तो कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता. तो कोणालातरी दिसला आणि मग तो तिथून पळाला. ड्रोनच्या सहाय्याने जी दिशा दिसली, त्यातून त्याला अटक करण्यात आली. ज्याने शेवटची माहिती दिली, त्याला एक लाखांचं बक्षिस देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त गावासाठी काय करता येणार, याचाही आम्ही विचार करणार आहोत”, असं अमितेश कुमार म्हणाले.

आरोपीला पकडायला आम्हाला उशीर झाला, पण आज त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज कोर्टात सादर केलं जाणार आहे, असंही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune rape case accused has tried to committed suicide mark on his neck says pune police sgk