पुणे : भिगवणहून पुण्याकडे निघालेल्या एका महिलेला दुचाकीवरुन सोडण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. पीडित महिलेने दिलेल्या वर्णनानुसार आरोपीचे रेखाचित्र पाेलिसांनी तयार केले होते. रेखाचित्रावरुन पोलिसांनी आरोपीचा माग काढला

जाक्या कोंडक्या चव्हाण (वय ३०, रा. लिंगाळी, ता. दौंड, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. चव्हाण सराइत असून, यापूर्वी त्याच्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. १० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास पीडित महिला पुणे-सोलापूर महामार्गावर थांबली होती. ती पुण्याकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत थांबली होती. भिगवण परिसरात आरोपी चव्हाण याने महिलेला दुचाकीवरुन पुण्याला सोडतो, असे आमिष दाखविले.

आरोपीने माळद गाव परिसरातील रेल्वे पुलाजवळ दुचाकी थांबवली. त्यानंतर त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन झाडात ओढत नेले. त्याने महिलेवर बलात्कार केला. महिलेला अंधारात सोडून चव्हाण पसार झाला. घाबरलेल्या महिलेने भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण, दौंड, तसेच स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार करण्यात आली. पीडित महिलेने दिलेल्या वर्णनावरून आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले. त्यानंतर दौंड, भिगवण भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली. सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच तांत्रिक तपास करुन पोलिसांनी आरोपी चव्हाण याला लिंगाळी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, भिगवण पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद महांगडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.