पुणे : मार्केट यार्डातील फळबाजारात आंध्र प्रदेशातून जांभळाची आवक सुरू झाली आहे. गावरान जांभळाचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, गुजरात, कर्नाटकातील जांभळाचा हंगाम संपला आहे.

जांभळाचा हंगाम एप्रिल महिन्यात सुरू होताे. हंगामाच्या पहिल्या टप्प्यात कोकणातून गावरान जांभळाची आवक होते. त्यानंतर गुजरातमधील बडोदा भागातून आवक सुरू होते. गुजरातपाठोपाठ कर्नाटकातील जांभळाची आवक सुरू होते. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आंध्र प्रदेशातून जांभळाची आवक सुरू होते. पुढील महिनाभर आंध्र प्रदेशातील जांभळाची चव चाखता येणार आहे. गावरान जांभळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील जांभूळ व्यापारी माउली आंबेकर आणि पांडुरंग सुपेकर यांनी दिली.

मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी (१५ जून) आंध्र प्रदेशातून ४० ते ५० टन जांभळाची आवक झाली. बाजारात दररोज साधारणपणे २५ ते ३० टन जांभळाची आवक होत आहे. घाऊक बाजारात आंध्र प्रदेशातील जांभळाला प्रतवारीनुसार १०० ते १५० रुपये दर मिळाला आहे. गावरान जांभळाला प्रतवारीनुसार घाऊक बाजारात १०० ते २०० रुपये दर मिळाला आहे.

मदनपल्ली जिल्ह्यात लागवड

‘आंध्र प्रदेशातील मदनपल्ली जिल्ह्यात जांभळाची सर्वाधिक लागवड हाते. आंध्र प्रदेशातील जांभळाचा रंग आकर्षक असून, गर जास्त आहे आणि बी लहान आहे,’ असे जांभूळ व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी नमूद केले.

गावरान जांभळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पुढील महिनाभर आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक सुरू राहणार आहे. आंध्र प्रदेशातून सलग तिसऱ्या वर्षी जांभळाची आवक झाली आहे. त्याला चांगली मागणी असून, येत्या काही दिवसांत आंध्र प्रदेशातील जांभळाची आवक वाढणार आहे. – माउली आंबेकर, जांभूळ व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड.