पुणे : अचानक बेशुद्ध पडल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना मेंदुमृत घोषित करण्यात आले. ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असल्याने अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत होते. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांचे यकृत प्रत्यारोपित करण्यात आल्याने एका व्यक्तीला जीवदान मिळाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील ६८ वर्षीय व्यक्ती ही मूत्रपिंड विकाराने त्रस्त होती. त्यामुळे ते अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षायादीत होते. ते अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या सीटी स्कॅन तपासणीत मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर करण्याचे प्रयत्न करूनही कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर डॉक्टरांनी त्यांना मेंदुमृत घोषित केले.

हेही वाचा…सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…

हा रुग्ण स्वत: अवयव प्रत्यारोपणासाठीच्या प्रतीक्षायादीत असल्याने कुटुंबीयांना अवयवदानाचे महत्त्व माहिती होते. त्यामुळे त्यांचे हृदय आणि यकृत दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, रुग्णाचे वय अधिक असल्याने केवळ यकृत दान करणे शक्य होते. कुटुंबीयांची परवानगी मिळाल्यानंतर तातडीने पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीशी संपर्क साधण्यात आला आणि प्रतीक्षायादीनुसार अवयवदान केले.

रुग्णाचे यकृत यशस्वीपणे काढण्यात आले आणि त्यानंतर त्याचे यशस्वीपणे प्रत्यारोपण पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमधील ५४ वर्षीय पुरुष रुग्णावर करण्यात आले. मेंदुमृत रुग्णांचे व्यवस्थापन करणे ही आव्हानात्मक गोष्ट असते. यामध्ये प्रमुख गोष्टींवर नियंत्रण मिळवून महत्त्वाचे अवयव योग्य पद्धतीने सुरू ठेवावे लागतात. आपल्या दु:खातही असा निर्णय घेणे, ही दात्याच्या परिवारासाठी कौतुकाची गोष्ट आहे. यातून अवयवदान करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल, असे मणिपाल हॉस्पिटलमधील डॉ. भूषण नगरकर यांनी सांगितले.

हेही वाचा…भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी

मेंदूत खूप मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो, त्या वेळी रुग्णाला वाचवणे खूपच कठीण असते. अशा वेळी त्याच्या कुटुंबीयांनी घेतलेला अवयवदानाचा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला नवजीवन मिळाले. डॉ. श्रेय शहा, मेंदूविकारतज्ज्ञ, मणिपाल हॉस्पिटल (बाणेर)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune senior citizen declared brain dead and his liver donation saved persons life pune print news stj 05 sud 02