पुणे: पहलगाम हल्ल्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून चौकशी करण्यात येणार असल्याची भीती दाखवून कोथरूड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोथरूडमधील महात्मा सोसायटीत राहणार्‍या ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक राहायला आहेत. २३ सप्टेंबर रोजी त्यांच्या मोबाइलवर अनोळखी क्रमांकावरून सायबर चोरट्यानी फोन केला. मी एनआयए अधिकारी असून पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणातील दहशतवाद्यांच्या खात्यात काही रक्कम जमा करण्यात आली आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये देखील काही रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या बँक खात्याची तपासणी करण्यात येणार असल्याचे सांगून बँक खात्यातील सर्व रक्कम आमच्या खात्यात तातडीने जमा करावी लागेल, असे सांगितले.

त्यानंतर घाबरलेल्या ज्येष्ठ नागरिकाने चोरट्याच्या वेगवेगळ्या बँक खात्यात स्वत:च्या बँक खात्यात ठेवलेले १ कोटी ४४ लाख ६० हजार रुपये पाठविले. पण नंतर चौकशीच्या नावाखाली चोरट्याने स्वत:च्या खात्यात जमा करून घेतलेली रक्कम परत मिळाली नाही आणि आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, आमच्याकडे जेष्ठ नागरिकांने तक्रार देताच, त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.